हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान राजापूरच्या वतीने शिवनेरी, पुरंदर किल्ल्यांची स्वच्छता

राजापूर : ऐतिहासिक गडदुर्गांना भेटी देऊन तेथील इतिहास जाणून घेण्याच्या उद्देशाने हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान राजापूर आयोजित शिवस्मरण यात्रेला शिलेदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यामध्ये सहभागी झालेल्या १०५ जणांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरी आणि छत्रपती संभाजीराजांची जन्मस्थळ असलेल्या किल्ले पुरंदरला भेट दिली. याप्रसंगी गड परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

गडकोट मोहिमेचा प्रारंभ राजापुरातील शिवतीर्थावर सर्व शिलेदार एकत्रित जमून शिवभक्तांचे आराध्य, समस्त राजापूरकरांचे स्फूर्तीस्थान, छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास गडकोट मोहीम प्रमुख विवेक गुरव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला, यावेळी छोटा शिलेदार निरंजन बावधनकर याने दमदार अशी गारद दिली. याप्रसंगी मोहिमेला निघालेल्या सर्व शिलेदारांनी जोरदार घोषणा दिल्या. उमेश कोळवणकर यांच्या हस्ते गाड्यांचे पूजन करण्यात आले. राजापूर अर्बन बँकेचे उपाध्यक्ष, प्रतिष्ठानचे मार्गदर्शक विवेक गादीकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दिलीप गोखले, हिंदू जनजागृतीचे विनोद गादीकर, विश्व हिंदू परिषदेचे संदेश टिळेकर, शिवभक्त विनय गादीकर, संदीप देसाई, आदी उपस्थित होते. त्यानंतर, सकाळी गडदुर्ग पुरंदर येथे स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मस्थानी सगळे शिलेदार नतमस्तक झाले. बालेकिल्ल्यावरील श्री केदारेश्वर मंदिरात महादेवाचे दर्शन घेतले आणि तेथील जीर्ण झालेला जुना ध्वज बदलून नवीन भगवा ध्वज प्रतिष्ठानच्या शिलेदारांनी फडकवला आणि हर हर महादेवच्या घोषणा दिल्या.

पुरंदर गडावरील छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मस्थानी असलेल्या संग्रहालयाला भेट देऊन माहिती घेतली व तेथील पवित्र सुवर्ण माती कलशात घेतली. जुन्नर येथील शिवजन्मस्थान गडदुर्ग शिवनेरीवर शौर्य गीते म्हणत छत्रपती शिवरायांचा जयजयकार करत चढाई केली. त्यानंतर शिवनेरी गडदुर्गावरील पहिला महादरवाजा येथे प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश मयेकर यांनी सर्व राजापूरकर शिलेदारांच्यावतीने मंत्रघोषात गडदेवतेला आवाहन करत गडपूजन करण्यात आले. यानंतर महादरवाजा, गणेश दरवाजा, पीर दरवाजा, हत्ती दरवाजा, शिवाई देवी दरवाजा, मेणा दरवाजा आणि कुलूप दरवाजा, शिवनेरीच्या सात दरवाजांना भेट देऊन तेथील इतिहासकालीन माहिती घेतली. गडावरील शिवजन्मस्थानी भेट देताना शिवजन्माच्या स्थानी शिवबांच्या पाळण्याचे आणि जन्मखोलीचे दर्शन घेतले. शिवजन्मस्थानावरील पवित्र सुवर्ण माती कलशात घेतली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:14 PM 25/Jan/2025