राजापूर : साखरी नाटे येथे होत असलेल्या नवीन मच्छिमार जेटीच्या प्रक्रियेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) विरोध असून, यासंदर्भात मनसेच्या तांत्रिक समितीने उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे आजतागायात देण्यात आली नाहीत. याबाबत मेरिटाइम बोर्डला आक्षेप पत्र देण्यात आले असून येत्या आठ दिवसांत उत्तरे मिळाली नाहीत, तर पुढच्या शुक्रवारी उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांनी दिला आहे.
साखरीनाटे येथे मच्छिमार जेटीचे काम जोरात सुरू करण्यात आले आहे. जेटी मंजुरीआधी जनसुनावणी घेण्यात आली होती. या जनसुनावणी वेळी जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकरून यांच्या मार्गदर्शनखाली मनसेचे उपतालुकाध्यक्ष जयेंद्र कोठारकर यांनी १३ तांत्रिक मुद्दे उपस्थित करून या प्रक्रियेला आक्षेप घेतला होता. तरीही जनसुनावणी तशीच पुढे रेटविण्यात आली. तशाच पद्धतीने निविदा प्रक्रिया राबवून कार्य आरंभ आदेश देऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात देखील झाली आहे; पण यावरील आमच्या आक्षेप असलेल्या मुद्यावर अद्याप उत्तरे देण्यात आली नाहीत. प्रस्तावित जेटी परिसरात कांदळवन आहे त्याचा नाश होणार आहे, मग येथील जैवविविधतेचे काय होणार? येथील अप्रोच रोड कसा असणार? वाहनतळ स्वच्छतागृह मलनीस्सारण व्यवस्था काय आहे? भविष्यात नौका दुरुस्तीमुळे सांडणारे तेल व वंगण यामुळे होणाऱ्या प्रदूषणचे काय? हे व असे अनेक प्रश्न मनसेच्या तांत्रिक समितीने उपस्थित केले आहेत. ज्याची उत्तरे आजतागायात देण्यात आली नाहीत. या संदर्भात मेरिटाइम बोर्डला आक्षेप पत्र देण्यात आले असून येत्या आठ दिवसांत उत्तरे मिळाली नाहीत, तर पुढच्या शुक्रवारी उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
हे पत्र देण्यासाठी जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर, विधानसभा अध्यक्ष जुनेद बंदरकर, रत्नागिरी उपजिल्हाअध्यक्ष अरविंद मालाडकर, राजापूर तालुकाध्यक्ष पंकज पंगेरकर, उपतालुकाध्यक्ष जयेंद्र कोठारकर, रत्नागिरी तालुकाध्यक्ष सचिन शिंदे, कामगार सेना जिल्हाचिटणीस महेंद्र गुळेकर, विभाग अध्यक्ष शैलेश मुकादम आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:55 PM 25/Jan/2025














