रत्नागिरी : भातपिकांवर करपा, कीडरोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी त्रस्त

रत्नागिरी : अति पाऊस, ढगाळ हवामान, कडक ऊन अशा बदलत्या हवामानामुळे रत्नागिरी तालुक्यातील भातशेतीवर कीडरोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. करपा, निळे भुंगेरे, किडीचा प्रादुर्भावामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. काही ठिकाणी हळवे भात पसवले असून, कापणीसाठी तयार झाले आहे. गरवे, निमगरवे पिक तयार झाले नसले, तरी कीडरोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतीचे नुकसान होण्याची भीती आहे.

अतिपाऊस व कडक उन्हामुळे, बदलत्या वातावरणामुळे तालुक्यातील भातशेतीवर करपा, भुंगे, किडीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. त्यामुळे तालुका कृषी विभाग कीड, करपा नियंत्रणसाठी सतर्क झाला आहे. भात लागवड झाल्यापासून जोरदार पाऊस सुरू होता. तालुक्यात यावर्षी ४१९७.८८ मि.मी. पाऊस पडला आहे. गणेशोत्सवापूर्वी काही दिवस पावसाने उसंत घेतली होती. उन्हाचा कडाका सुरू झाल्याने त्याचा परिणाम भातशेतीवर दिसू लागला. तालुक्यातील अनेक गावांत करपा, भुंगेरे व किडीचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयाकडे धाव घेतली आहे. बदलत्या वातावरणामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. सध्या भातपिकाची पसवण्याची प्रक्रिया सुरू असून, तालुक्यातील भातपिकांवर करपा आणि किडीचे संकट आले आहे. या रोगामुळे भातपिकाच्या पाती लालसर, तांबड्या पडत असून रोपे जळून जात आहेत.

वेळीच उपाययोजना करणे आवश्यक
या रोगावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. उपाययोजना न केल्यास भातपिकाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. यामुळे हाताशी आलेले भातपिक गमावण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. करपा रोगाबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी येऊ लागल्याने तालुका कृषी विभाग सतर्क झाला आहे. कीड व करपापासून प्रतिबंधात्मक उपाय, औषध फवारणीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:25 PM 01/Oct/2024