रत्नागिरी जिल्ह्यासाठी ४० हजार कोटींच्या उद्योगांचे सामंजस्य करार : पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली दावोस येथे १५ लाख ७० हजार कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले.

त्यापैकी ४० हजार कोटींचे सामंजस्य करार रत्नागिरी जिल्ह्यासाठी आहेत. त्यामुळे २५ ते ३० हजार युवक-युवतींना आता रोजगार उपलब्ध होणार आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी येथे दिली.

छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर मुख्य शासकीय सोहळ्यात देशाच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. त्यावेळी ते बोलत होते.

सामंत म्हणाले, सोहळ्यास उपस्थित सन्माननीय स्वातंत्र्य सैनिक, त्यांचे कुटुंबीय, लोकप्रतिनिधी, अधिकारी तसेच कर्मचारी, पत्रकार मित्र आणि जिल्ह्यातील सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या सर्वप्रथम मी मन:पूर्वक शुभेच्छा देतो. जगात सर्वांत मोठी लोकशाही असणाऱ्या आपल्या भारत देशाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून मजबूत केले आहे. समाजवादी, धर्मनिरपेक्ष, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांवर आपल्या देशाची गतिमान पावले पडत आहेत. सर्वसामान्य नागरिक हा आपल्या लोकशाहीचा, विकासाचा केंद्रबिंदू आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या देशाचा दबदबा जगात वाढत चालला आहे. सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना चालू आर्थिक वर्षाचा जिल्ह्याचा ३६० कोटी रुपयांचा मंजूर अर्थसंकल्पीय नियतव्यय असून, जिल्ह्याच्या विकासावर तो १०० टक्के खर्च होईल.

रत्नागिरी जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा जिल्हा आहे. पर्यटनाचे वेगवेगळे प्रकल्प जिल्ह्यात व्हावेत, अशी सर्वांची इच्छा होती. कोट्यवधी रुपये खर्च करून जिल्ह्यामध्ये पर्यटन स्थळे विकसित होत आहेत. तालुकाच्या ठिकाणी शिवसृष्टी ही संकल्पना महाराष्ट्रात प्रथम जिल्ह्यात उदयास आली. दापोली, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर येथे शिवसृष्टी उभारण्यात आली आहे. उर्वरित तालुक्यातही शिवसृष्टी उभारण्याचे काम दोन वर्षांत केले जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन केंद्र तयार होत आहे. याचा उपयोग देशातील आणि परदेशातील शिवप्रेमींना होणार आहे. देशातला पहिला थ्रिडी मल्टीमीडिया शो महिनाभरात सुरू होणार आहे. २०० कोटी रुपये खर्चून रत्नागिरीत झालेल्या टाटा कौशल्यवर्धन केंद्रातून ५ हजार विद्यार्थी पुढे येणार आहेत. कोट्यवधी रुपयांचा विमा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाला आहे. रत्नागिरी शहरातील नवीन प्रशासकीय इमारत, जिल्हा परिषदेची इमारत, पोलीस अधीक्षकांचे कार्यालय या सर्व इमारती ८०० कोटी रुपये खर्चून सुसज्ज होत आहेत. २४ कोटी रुपयांमधून निर्माण होणाऱ्या क्रिटिकल केअर युनिटचे भूमिपूजन होणार आहे. प्रादेशिक मनोरुग्णालयाची इंग्रजकालीन वास्तू डागडुजी करण्यासाठी १४ कोटी मंजूर करण्यात आले आहेत. त्याचे काम सुरू आहे. प्रादेशिक मनोरुग्णालय कुठेही जाणार नाही, जिल्ह्यातच राहणार आहे, अशी खात्रीही पालकमंत्र्यांनी दिली.

भविष्यामध्ये सैनिकांच्या हातातील बंदुकांचा कारखाना हा आपल्या रत्नागिरीमध्ये आणण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो आहोत. त्यासाठी दावोसमध्ये १६ हजार ५९०० कोटींचा सामंजस्य करार धिरुभाई अंबानी डिफेन्स क्लस्टरबरोबर झाला आहे. हा आपणा सर्वांचा अभिमान व स्वाभिमान आहे, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, थिबा राजाने ज्या ठिकाणी भगवान गौतम बुध्दांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती, त्याठिकाणी साडेआठ कोटी खर्चून बौद्ध विहाराच्या वास्तूचे काम सुरू करण्यात आले आहे. देशातील पहिले सागरी विद्यापीठ रत्नागिरीत होत आहे, त्याची सुरुवात वर्षभरात करायची आहे. पुस्तकांचे गाव मालगुंडला केले जाईल, त्यासाठी सव्वा कोटी रुपये मराठी विभागाकडून दिले जातील. भविष्यातही देशाची, झेंडाची शान अशीच कायम ठेवावी, त्यासाठी देशभक्तीपर कार्यक्रम प्रशासनाकडून राबविले जावेत, असेही पालकमंत्री म्हणाले.

पालकमंत्री सामंत यांनी संचलनाचे निरीक्षण केले. त्यानंतर पोलीस पथक, महिला पोलीस पथक, गृह रक्षक दल, पोलीस बँड पथक, गृह रक्षक महिला पथक, एनसीसी स्काऊट गाइड, एनसीसी नेवल, नवोदय विद्यालय स्टुडन्ट पोलीस कॅडेट, विराट श्वान पथक, जलद प्रतिसाद पथक, अग्नीशामन दल, उमेद टुरिस्ट व्हॅन, प्राथमिक शिक्षक विभाग आदींनी संचलन करून मानवंदना दिली. यामध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालय, ए डी नाईक गर्ल्स हायस्कूल, गोदुताई जांभेकर विद्यालय, पटवर्धन हायस्कूल, शिर्के हायस्कूल, मेस्त्री हायस्कूल, कॉन्व्हेन्ट स्कूल आदींचा सहभाग होता.

समाजकल्याण कार्यालयातर्फे घर घर संविधान अंतर्गत जिल्हा प्रशासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पालकमंत्र्यांना संविधानाच्या उद्देशिकेची प्रत प्रदान करण्यात आली. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक सुलभा श्रीपाद धाक्रस, तृतीयपंथी पल्लवी प्रकाश परब आणि दिव्यांग प्रशांत महेंद्र सावंत यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते संविधानाच्या उद्देशिकेची प्रत देण्यात आली. यावेळी सहाय्यक आयुक्त दीपक घाटे उपस्थित होते.

ध्वजदिन निधी संकलनामध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल जिल्हाधिकारी सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला. फोर्सवन पथकामध्ये विशेष सेवा पथक सोहेल इक्बाल ढगे, उत्कृष्ट उद्योजक शर फरद्दीन अब्दुला साखरकर, शिराजउद्दीन अब्दुला साखरकर प्रथम पुरस्कार, दत्तात्रय जाधव द्वितीय पुरस्कार, आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रशांत महेंद्र सावंत यांचा सत्कार करण्यात आला.

अॅग्रीस्टॅक योजनेमध्ये शेतकरी ओळख क्रमांक सन्मानपत्र उमेश लाड, दत्तात्रय सोहोनी आणि संतोष सकपाळ यांना देण्यात आले.

सॅक्रेड हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूलने वंदन भारतमातेला व संविधानाला, एम. एस. नाईक हायस्कूलने भारत का नया चेहरा आणि पटवर्धन हायस्कूलने देशभक्तीपर नृत्य सादर करून उपस्थितांना भारावून टाकले. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अप्रतिम सांस्कृतिक कार्यक्रमाने स्टेडियम जिंकले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:29 27-01-2025