सावर्डेत महावितरण अधिकाऱ्याच्या गाडीची तोडफोड

सावर्डे : केदारनाथ कॉलनी येथे पूर्ववैमनस्यातून मारहाण, जातिवाचक शिवीगाळ करीत महावितरण अधिकाऱ्याच्या गाडीची तोडफोड करण्याची घटना शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी सावर्डे पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दिली असून तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी गिरीष राजाराम कोकाटे, अजित राजाराम कोकाटे (दोघेही रा. सावर्डे बाजारपेठ), अशोक गंगाराम काजरोळकर (सावर्डे) अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत. याबाबत उद्योजक गिरीष कोकाटे तसेच महावितरणमध्ये अधिकारी असलेल्या अशोक काजरोळकर यांनी परस्परविरोधी फिर्याद दिली आहे. अशोक काजरोळकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांनी ८ महिन्यांपूर्वी कोल्हापूर येथे गिरीष कोकाटे यांच्याविरुध्द जीएसटी कार्यालयात तक्रार केली होती. त्यानंतर २१ जानेवारी रोजी कोल्हापूर जीएसटी कार्यालयाने कोकाटे यांच्या दुकानावर धाड टाकली होती. हा राग मनात धरून काजरोळकर यांच्या घराच्या ठिकाणी २४ रोजी रात्री १० वाजता गिरीष व अजित कोकाटे हे हातात लोखंडी शिग घेऊन आले. यावेळी त्यांनी मारहाण तसेच जातीवाचक शिवीगाळ करत काजरोळकर यांना ठार मारण्याची धमकी दिली. मारहाण सोडवण्यासाठी काजरोळकर यांची पत्नी व मुलगा हे आले असता, त्यांनाही त्या दोघांनी ढकलले. यानंतर काजरोळकर यांच्या मालकीच्या कारची गिरीष व अजित यानी तोडफोड केली. या मारहाणीत काजरोळकर हे जखमी झाले. या प्रकरणी गिरीष व अजित कोकाटे याच्यावर गुन्हा दाखल झाला. गिरीष कोकाटे यांनीही परस्परविरोधी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत अशोक काजरोळकर यांनी आपल्याला लोखंडी शिगेने मारहाण केल्याचे नमुद केले आहे. त्यामुळे काजरोळकर यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:51 AM 27/Jan/2025