राजापूर : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांकडून पोर्टलवर स्वयंनोंदणी करताना अपलोड केलेल्या कागदपत्रांच्या छाननीच्यावेळी बहुतांश प्रकरणांमध्ये केवळ सातबारा अपलोड केल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. अशी सर्व प्रकरणे शासन निर्देशानुसार कृषी विभागाकडून रिव्हर्ट करण्यात आली आहेत. अशा शेतकऱ्यांना मान्यतेसाठी नव्याने सातबारासह अन्य कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. त्यामध्ये तालुक्यातील सुमले २ हजार ७०० प्रकरणांचा समावेश असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.
केंद्र शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना राबविली जात असून, त्याअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला काही रक्कम दिली जाते. या योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांकडून शासनाच्या पोर्टलवर ऑनलाईन स्वयंनोंदणी करताना शेतकऱ्यांचे भूमी अभिलेख नोंदी संदर्भातील फेरफार, सातबारा उतारा, आठ अ, पती-पत्नी यांचे आधार कार्ड अपलोड करण्याची सुविधा अर्जदारास उपलब्ध करून दिलेली आहे. या सुविधेमधून शेतकऱ्यांनी अपलोड केलेले दस्तऐवज तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय नोडल अधिकारी यांना मान्यता प्रदान करण्यापूर्वी तपासण्यासाठी पोर्टलवर उपलब्ध असतात. तालुका व जिल्हास्तरावरून मान्यता दिलेल्या स्वयंनोंदणीकृत शेतकऱ्यांची प्रकरणे तपासली असता, त्यामध्ये केवळ सातचारा व्यतिरिक्त अन्य कोणतीही कागदपत्रे अपलोड केलेली नसल्याचे दिसून आले. त्यामुळे अशी सर्व प्रकरणे रिव्हर्ट करून संबंधित शेतकऱ्यांना नव्याने कागदपत्र अपलोड करण्याचे निर्देश शासनाकडून देण्यात आले आहेत. त्याची अमलबजावणी स्थानिक पातळीवर कृषी विभागाकडून करण्यात येत असून, संबंधितांशी संपर्क साधण्याला सुरुवात करण्यात आली आहे.
दरम्यान, पोर्टलच्या माध्यमातून स्वयंनोंदणी केलेल्या तालुक्यातील शेतकयांना आधीच प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभासाठी सहा महिने थांबावे लागलेले आहे. आता शासनाच्या नव्या निर्देशानुसार कागदपत्र जोडून मान्यता मिळाल्यानंतर लाभ मिळणार असल्याने संबंधित शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभासाठी आता आणखी काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.
शेतक-यांशी मोबाईल मेसेज वा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून संपर्क साधण्यात येत आहे. संबंधितांनी तत्काळ प्रकरण मान्यतेसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पोर्टलद्वारे पूर्तता करावी. – अनिल गावित, तालुका कृषी अधिकारी
या कागदपत्रांची आवश्यकता
मागील तीन महिन्यातील डिजिटल वा तलाठी सहीचा सातबारा
जमीन नोंदीचा फेरफार (लाभार्थीच्या नावे जमीन धारणा १ फेब्रुवारी, २०१९ पूर्वीची असणे आवश्यक अपवाद वारसा हक्काने झालेले जमीन हस्तांतरण)
वारसा नोंद फेरफार मयत १ फेब्रुवारी, २०१९ नंतरची असल्यास ज्यांच्या नावावरून बारसाने जमीन आली त्यांच्या नावे जमीन आलेला वा असलेला फेरफार,
पत्नी व १८ वर्षाखालील अपत्यांचे आधार कार्ड.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:56 PM 01/Oct/2024














