Ratnagiri : होळीनिमित्त रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल्ल !

रत्नागिरी : अवघ्या दीड महिन्यांवर आलेल्या होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी रेल्वे, एसटी आणि खासगी बसचे आरक्षण शोधण्यास सुरु केले आहे. सणासुदीच्या काळात गावी जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. त्यातच गावी जायचं म्हटलं की पहिलं प्राधान्य भारतीय ट्रेनला दिले जाते. कारण ट्रेनचा प्रवास हा सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा असतो. कोकणात होळी सणाचा आनंद वेगळाच असतो. या सणानिमित्ताने लाखो कोकणवासी मुंबईहून आपापल्या गावी जातात.

होळीचा सण जवळ आल्याने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग सुरु झाली आहे. अनेकांनी महिन्यापूर्वीच आरक्षण करुन ठेवले आहे. असे असेल तरी कोकणात जाणाऱ्या गाड्यांची प्रतीक्षायादीही तितकीच मोठी आहे. कोकणात होळी १३ मार्च रोजी साजरी केली जाणार आहे. होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची विशेष गर्दी कोकण रेल्वे मार्गावर दिसते. कोणताही सण असला की रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असते. त्यामुळे अनेक प्रवशांना रेल्वेमध्ये आरक्षण मिळत नाही.

कोकणात हा सण सुमारे १५ दिवस साजरा केला जातो. यंदा १३ मार्च पासून शिमग्याला सुरुवात होत आहे. मात्र या तारखेदरम्यानच्या जवळजवळ सर्वच गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याने ज्या चाकरमान्यांना आरक्षण मिळाले नाही त्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. होळी आणि धूलिवंदन दिवशीच्या आणि आदल्या दिवशीच्या (१२,१३, १४ मार्च) तुतारी, कोकणकन्या, मांडवी, वंदे भारत, जनशताब्दी एक्सप्रेस, दिवा सावंतवाडी एक्सप्रेस, मत्स्यगंधा एक्सप्रेसची आरक्षण स्थिती ‘रिग्रेट’ दाखवत आहे.

नियमित गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याने चाकरमान्यांना अतिरिक्त गाड्यांची घोषणा होण्याची वाट पहावी लागणार आहे. अजूनपर्यंत रेल्वे प्रशासनाने कोणत्याही अतिरिक्त गाडीची घोषणा केली नाही आहे. मात्र या सणादरम्यान गाड्यांची आरक्षण स्थिती पाहता रेल्वे प्रशासनाला या मार्गावर जास्त गाड्या सोडाव्या लागणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:23 PM 27/Jan/2025