मिरकरवाडा अतिक्रमण: पाळणाघरासह स्वच्छतागृहही तोडले!

रत्नागिरी ः रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदराच्या जागेतील अतिक्रमण हटविताना राजीवडा महिला मच्छीमार तालुका सहकारी संस्थेचे पाळणाघर, स्वच्छतागृहाचे बांधकामसुद्धा तोडण्यात आले. यावेळी संस्थेच्या सदस्य महिलांसह इतरांनी विरोध केला. परंतु हा विरोध न जुमानता तेथील बांधकाम जेसीबीने तोडण्यात आले. याप्रकरणी झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी न्यायालयात दावा दाखल करणार असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा मीराबाई गोपाळ खराडे यांनी सांगितले.

मिरकरवाडा बंदरात मत्स्यव्यवसाय विभागाने करार करून दिलेल्या जागेत राजीवडा महिला मच्छीमार तालुका सह. संस्था कार्यालय आणि डिझेल पंप आहे. सुमारे 1 हजारपेक्षा अधिक महिला सदस्य असलेल्या या संस्थेने अडीच वर्षांपूर्वी मच्छीमार महिलांच्या लहान मुलांसाठी पाळणाघर बांधण्याची परवानगी मिळण्यासाठी मत्स्य व्यवसाय मंत्रालयाकडे अर्ज करण्यात आला होता. मंत्रालयाने याबाबत रत्नागिरीतील मत्स्य व्यवसाय विभागाकडे या संदर्भात अहवाल मागवला होता. परंतु मंत्रालयाला किंवा अर्जदार संस्थेलाही काहीच कळवले न गेल्याने परवानगी गृहीत धरून पाळणाघराचे बांधकाम करण्यात आले होते. हे बांधकाम आणि स्वच्छतागृहाचे बांधकाम अतिक्रमण हटाव मोहीम पथकाने सोमवारी दुपारी जमीनदोस्त केले.

दरम्यान, हे बांधकाम तोडण्यास राजीवडा महिला मच्छीमार तालुका सह. संस्थेच्या महिला सदस्य आणि उपस्थित रहिवाशांनी विरोध केला. परंतु, या हस्तक्षेपाकडे दुर्लक्ष करून ते पाडण्यात आले. संस्थेच्या महिला सदस्यांकडून अतिक्रमण हटाव पथकाकडून झालेल्या पाडकामाची पंच यादी मागण्यात आली. ही मागणीही दुर्लक्षित झाली असल्याचे संस्थेचे अध्यक्ष मिराबाई खराडे यांनी म्हटले आहे. 24 रोजी सायंकाळी 6.40 वा. अतिक्रमण हटविण्याची नोटीस देवून तिसर्‍या दिवशी बांधकाम तोडण्यात आले. एवढ्या कमी अवधीत अशी कारवाई करणे योग्य नसल्याचे अध्यक्षांनी म्हटले आहे. या कारवाईत झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, यासाठी न्यायालयात दाद मागणार असल्याचेही अध्यक्षा खराडे यांनी म्हटले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:23 28-01-2025