दापोली : चारशे वर्षे जुना हर्णे किल्ला आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देत उभा आहे. 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनी हर्णे सुवर्णदुर्ग किल्ल्यावर तिरंग्याला मानवंदना देण्यात आली. इतिहासात पहिल्यांदाच गडावर ध्वजारोहण केल्याने दापोली तालुक्याचा ऊर अभिमानाने भरून आला आहे, तर शासनाने घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सुवर्णदुर्गची तटबंदी आज चारशे वर्षांनंतरही अभेद्य आहे. सन 1660 ते 1665 दरम्यान या किल्ल्याची उभारणी छत्रपती शिवाजी महाराज यांनी केली. छत्रपतींनी मजबूत किल्ला बांधल्याची नोंद डिसेंबर 1664 च्या डच रिपोर्टमध्येही आढळून येते. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेला हा किल्ला केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात आहे. किल्ल्याला ‘वर्ल्ड हेरीटेज’चा दर्जा मिळणार आहे, तर प्रशासनाकडून देखील हालचालींना वेग आला आहे. संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संस्था युनेस्कोने यांनी जलदुर्गाची नुकतीच पाहणी केली आहे. त्यामुळे देशात या किल्ल्याला महत्त्व प्राप्त होणार आहे. मराठी आरमाराचा मानबिंदू असा उल्लेख या किल्ल्याचा होतो. दापोली शहरापासून हर्णे किल्ला हा 15 कि.मी अंतरावर आहे.
या ध्वजारोहणप्रसंगी पोलिस उपनिरीक्षक दत्ता पवार, पोलिस हेड कॉन्स्टेबल संतोष सडकर, रूपेश दिंडे, दिलीप नवाले, पंकज पवार, कस्टम विभागाचे अकीत पोनी, बंदर निरीक्षक सुनील पाटील, मत्स्य विभागाचे सागरी पर्यवेक्षक प्रशांत येवले आदींसह विविध विभागांचे कर्मचारी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:45 28-01-2025














