वाचन चळवळीसाठी ग्रंथालय सक्षम करा : गजानन कोटेवार

गुहागर : ग्रंथालय चळवळीच्या माध्यमातून वाचन चळवळ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यात यश आले आहे. आजच्या आधुनिक युगात वाचन चळवळ टिकून ठेवण्यासाठी व विकसित होण्यासाठी ग्रंथालय सक्षमतेने उभी राहण्याची काळाची गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गजानन कोटेवार यांनी केले.

तालुक्यातील पाटपन्हाळे येथे जिल्हा ग्रंथालय संघाचे ४८ व्या वार्षिक अधिवेशनात ते बोलत होते. या प्रसंगी डॉ. कोटेवार म्हणाले, ग्रंथालय सक्षमतेने उभी राहण्यासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन ग्रंथालयांना मोठ्या प्रमाणात निधी दिला पाहिजे. भौतिक विकासासोबत मनुष्याचा शाश्वत विकास होणे गरजेचे आहे. त्यासाठी वाचन चळवळ हा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे आणि ही चळवळ अखंड जिवंत राहण्यासाठी ग्रंथालय सक्षम होण्याची गरज आहे.

अधिवेशनाची सुरुवात डॉ. कोटेवार यांच्या हस्ते झाली. या वेळी जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष श्रीकृष्ण साबणे, कोकण विभागाचे अध्यक्ष दिलीप कोरे, प्रशांत पाटील, हेमंत काळोखे आदी उपस्थित होते. अधिवेशनाचे प्रास्ताविक राजेंद्र आरेकर यांनी केले. या प्रसंगी पद्मभूषण डॉ. धनंजय कीर खुल्या लेख स्पर्धेतील विजेते प्राची राव, संतोष दरेकर, मंजुश्री भागवत, ऐश्वर्या शिंदे व प्रतीक जाधव यांना गौरवण्यात आले. तसेच ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षेतील यशस्वी गौरी डोंगरे, अर्चना राणी आणि प्रशांत यांचाही सन्मान करण्यात आला.

दुसऱ्या दिवशीच्या सत्रात ग्रंथदिंडी वाद्यवृंदासह काढण्यात आली. निवेदिका श्रद्धा वझे यांच्या अभिवचनाचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर रत्नागिरी जिल्हा ग्रंथ संघाचे खुले अधिवेशन श्री साबणे यांच्या अध्यक्षतेखाली संघ अधिवेशन व सर्वसाधारण सभेला झाला. संघाचे कार्यवाह महेंद्र दळ्वी यांनी आलेले ठराव वाचून दाखवून ठरावांवर चर्चा होऊन एकमताने करण्यात आले.

विविध पुरस्कारांचे वितरण
जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने देण्यात येणारा (कै.) गजानन तथा दादा कालेकर राज्यस्तरीय विशेष ग्रंथालय पुरस्कार सुनील कुबल यांना तसेच जिल्हास्तरीय आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार श्रीकांत पाटील व पल्लवी सावंत यांना प्रदान करण्यात आला. जिल्हास्तरीय आदर्श सेवक पुरस्कार रश्मी शिंदे व शिल्पा दळवी यांना देण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:26 AM 28/Jan/2025