आम्ही गुवाहाटीला गेलो नसतो, तर लाडक्या बहिणीला पैसे मिळाले असते का? : शहाजीबापू पाटील

सांगली : महाविकास आघाडीमध्ये भावी मुख्यमंत्र्यांचे दहा-बारा पोस्टर्स लागतात, पण महायुतीमध्ये एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होणार यात तिळमात्र शंका नाही असं वक्तव्य शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी केलं.

ठाकरे गटाचे नेते आमच्यावर 50 खोके घेतल्याचा आरोप करतात, पण आमच्यावर आरोप करणाऱ्यांना देव माफ करणार नाही असंही ते म्हणाले. विट्यामध्ये टेंभू योजनेच्या कार्यक्रमाच्या शुभारंभी ते बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सांगली जिल्ह्यातील टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. खानापूर-आटपाडीचे माजी आमदार अनिल बाबर यांचे स्वप्न असलेल्या टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याच्या कामांचा मुख्यमंत्रीनी शुभारंभ केला.

आम्हाला 50 खोके मिळाले नाहीत

यावेळी आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी पोराच्या डोक्यावर हात ठेवून सांगावे की शिंदेंसोबतच्या आमदारांना 50 खोके भेटले. आम्हीपण आमच्या पोराच्या डोक्यावर हात ठेवून सांगू की आम्हाला 50 खोके भेटले नाहीत. उठ सुट 50 खोके आम्हाला मिळाले असे ओरडत आहेत. पण पन्नास खोक्यांचा आमच्यावर आरोप करणाऱ्यांना देव माफ करणार नाही.

आम्ही जर गुहावाटीला गेलो नसतो तर लाडक्या बहिणीला पैसे भेटले असते का? असा सवाल यावेळी शहाजीबापू पाटील यांनी विचारला.

एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री एकदम ओके

यावेळी शहाजीबापू पाटील यांनी त्यांचा प्रसिद्ध डॉयलॉग मारला. ‘एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री एकदम ओके’ असं म्हणताच उपस्थितातून त्याला दाद मिळाली. मविआमधील नेत्यांचे भावी मुख्यमंत्र्यांचे दहा-बारा पोस्टर लागतात, पण एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होणार यात तिळमात्र शंका नाही असं शहाजीबापू पाटील म्हणाले.

मविआने भंगार गोळा करायला सुरुवात केली आहे असा टोला महाविकास आघाडीमध्ये होणाऱ्या इन्कमिंगवर शहाजीबापू पाटील यांनी लगावला. महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आम्हाला भेटत नव्हते.

संजय राऊतांना मतदान करायची इच्छा नव्हती

शहाजीबापू पाटील म्हणाले की, संजय राऊतांना मतदान करण्याची आमची इच्छा नव्हती. पण आम्हाला संजय राऊत नाही शिवसेना महत्त्वाची होती. त्यामुळे सर्वांनी गुपचूप मतदान करावं असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं.

शहाजीबापू पाटील म्हणाले की, अनिलभाऊ बाबर निवडणुकीत पडले तरी पुन्हा ताकतीने उठून काम करायचे. माझ्या इतकं तर आमदारकीला कोणी पडलं नाही. गणपतराव देशमुख माझ्या विरोधात सर्वाधिक वेळा निवडून आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:30 01-10-2024