राजापूर : परुळे (ता. राजापूर) ग्रामपंचायत माझी वसुंधरा उपक्रमांतर्गत हरित भेटवस्तूचे आयोजन करण्यात आले होते. त्याअनुषंगाने मकरसंक्रांत आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित महिलांच्या हळदीकुंकू समारंभात महिलांना हळदीकुंकवाचे वाण म्हणून भाजीची रोपे वाटण्यात आली.
गावातील प्रत्येक महिलेने आपली परसबाग समृद्ध करावी, यासाठी ग्रामपंचायतीने खारीचा वाटा उचलला. माझी परसबाग माझा अभिमान हे उपक्रमाचे ब्रीदवाक्य होते. आपल्या परसात ताजी आरोग्यदायी भाजी पिकविण्याची प्रेरणा प्रत्येक महिलेला मिळावी यासाठी सरपंच सौ. रंजनी श्रीराम सावंत यांनी हा अभिनव उपक्रम राबवला. महिलांना टोमॅटो, मिरची, कोबी, वांगी अशा विविध प्रकारच्या जातींची रोपे वाटण्यात आली . ज्या महिला रोपांचे संगोपन करून उत्तमरीत्या उत्पादन घेतील, त्यांना महाराष्ट्र दिनी प्रमाणपत्र वाटप करण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले. या कार्यक्रमाला गायिका श्रीमती मीनल मनोहर सावंत, परुळे जिल्हा परिषद साळेच्या शिक्षिका शुभांगी सागरे व मानसी सुर्वे, ग्रामसंघाच्या सचिव मानसी मुरारी सावंत, ग्रामपंचायत सदस्य गोलीपकर व श्रीमती पल्लवी सावंत उपस्थित होत्या. उपक्रमाला महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलम सावंत यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:28 28-01-2025














