चिपळुणातील कुंभार दाम्पत्याचे रत्नागिरी जि. प. समोर उपोषण

चिपळूण : शहरालगतच्या धामणवणे ग्रा.पं. हद्दीमध्ये ग्रा. पं. सदस्याने बिनशेती जागेत रस्त्यावर अतिक्रमण केल्याच्या विरोधात येथील ग्रामस्थ राणी मालसिंग कुंभार व मालसिंग नानबा कुंभार या दोघांनी संबंधितांना अपात्र करावे या मागणीसाठी प्रजासत्ताकदिनी रत्नागिरी येथे जि. प. कार्यालयासमोर उपोषण केले. गेले अनेक दिवस त्यांचा लढा सुरू आहे.

याआधी त्यांनी चिपळूण पं. स.समोर देखील उपोषण केले होते. अखेर मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या कारवाईच्या आश्वासनानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आले आहे.

26 जानेवारी रोजी कुंभार दाम्पत्य उपोषणाला बसले. यावेळी राणी कुंभार यांना उन्हामुळे चक्कर आल्याने त्यांना सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले. अखेर याची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या जागेप्रश्नी अंतीम निर्णय घेण्यासाठी सर्व महसूल अधिकारी, चिपळूण पंचायत समिती, धामणवणे ग्रामपंचायत, सरपंच, ग्रामसेवक, ग्रा.पं. सदस्य यांच्या उपस्थितीत सुनावणी लावण्यात येईल, असे आश्वासन दिले आणि त्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. लेखी आश्वासन दिल्यानंतर कुंभार दाम्पत्याने हे उपोषण स्थगित केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 29-01-2025