रत्नागिरी : मिरकरवाडा बंदरातील अतिक्रमण हटवल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी मत्स्य विभागाने पाडकामानंतर साचलेला कचरा अन्यत्र हलवत साफसफाई केली. दरम्यान बंदराच्या सुरक्षेसाठी १८ सुरक्षारक्षकांना मंजुरी मिळावी, अशी मागणी रत्नागिरी मत्स्य विभागाकडून करण्यात आली आहे.
मिरकरवाडा बंदरात सोमवारी पोलीस बंदोबस्तात जवळपास १२ तासहून अधिक वेळ कारवाई करीत सर्व अनधिकृत बांधकामे, झोपड्या हटवण्यात आल्या. यात लोखंडी सामान, जळावू सामानासह राडारोडा मोठ्याप्रमाणात होता. यातील लोखंडी सामान एका बाजूला करुन ठेवण्यात आले तर राडारोडा सहा जेसीबी मशिन व डंपरच्या सहाय्याने उचलून अन्यत्र मत्स्य विभागाच्या जागेतच टाकण्यात आला. यावेळीही मोठ्याप्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मत्स्य विभागाचे सहा. संचालक व्ही. एम. भादुले, सहा. आयुक्त आनंद पालव व त्यांचे सहकारी लक्ष ठेवून होते.
मिरकरवाडा बंदरातील साफसफाई करण्यात आल्यानंतर याठिकाणी पुन्हा अनधिकृत बांधकामे उभारली जाऊ नयेत यासाठी मत्स्य विभागाकडून सुरक्षा रक्षक नेमले जाणार आहेत. यासाठी १८ सुरक्षा रक्षकांची मागणी आयुक्त कार्यालयाकडे प्रस्तावाद्वारे करण्यात आली आहे. यावर जवळपास ३० ते ३२ लाखाचा खर्च अपेक्षित असून या प्रस्तावाला मंजूरी मिळाल्यानंतर सुरक्षा रक्षक पुरवण्याबाबत कामगार आयुक्तांकडे मागणी केली जाणार असल्याचेही सहा. आयुक्त आनंद पालव यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 AM 29/Jan/2025














