मातृभाषा विचारात आणणे गरजेचे : डॉ. हरेंद्र सोष्टे

चिपळूण : माणूस हा असा प्राणी आहे, ज्याने आपली भाषा स्वतः विकसित केली आहे. आपण स्वप्ने देखील आपल्या मातृभाषेतच पाहतो. त्यामुळे मातृभाषेचा माज न करता ती आपल्या विचारात आणली पाहिजे. शिक्षणात मराठी भाषेची सक्ती करून उपयोग नाही तर, ती व्यवहारात जेव्हा वापरली जाईल तेव्हाच ती खऱ्या अर्थाने राजभाषा होईल, असे उद्‌गार गोविली (कल्याण) येथील प्रा. डॉ. हरेंद्र सोष्टे यांनी डीबीजे महाविद्यालयाच्या माय मराठी उत्सवाप्रसंगी काढले.

येथील नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे महाविद्यालय मराठी विभाग व भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने ‘मराठी भाषा रोजगाराच्या संधी’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथदिंडीने करण्यात आली. आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात प्रा. सोष्टे पुढे म्हणाले की, संत नामदेव महाराजांनी मराठी भाषेचा प्रसार अटकेपार केला. शाहिरांनी पोवाड्यातून तर, बखरकारांनी बखरीतून शिवचरित्र सामान्य लोकांपर्यंत पोहोचवले. दलित साहित्याने तळागाळातील लोकांच्या व्यथा साहित्यातातून मांडल्या. ग्रामीण साहित्याने श्रमाला वाचा फोडली, तर आदिम समाजाची नोंद आदिवासी साहित्याने घेतली. स्त्रीवादी साहित्याने स्त्रियांच्या कथा प्रकाशात आल्या. मराठी साहित्य घेऊन करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांनी भाषिक कौशल्य विकसित केले पाहिजे. यामध्ये श्रवण कौशल्य, लेखन कौशल्य, वाचन कौशल्य आणि संभाषण कौशल्य यांचे महत्त्व समजून त्यामध्ये विशेष ज्ञान मिळवले पाहिजे. तसेच त्यांनी आकाशवाणी, दूरचित्रवाणी, वृत्तनिवेदक, भाषांतरकार, दुभाषी, रेडीओ जॉकी, सूत्रसंचालक, पटकथा लेखक, मालिका लेखन अशा विविध करिअरच्या संधी विद्यार्थ्यांना दृक-श्राव्य माध्यमाच्या आधारे सांगितल्या.

कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव बापट, भाषा संचालनालयाचे अधीक्षक अभयराजे कुलकर्णी, मराठी विभागप्रमुख प्रा. राजरत्न दवणे, उपप्राचार्य डॉ. आर. एम. मोरे, कार्यालय प्रबंधक अनिल कलकुटकी, ग्रंथपाल डॉ. एस. पी. मोरे, क्लस्टर महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. प्रस्तावना भाषा संचालनयाचे अधीक्षक अभयराजे कुलकर्णी यांनी केली. प्रमुख वक्त्यांची ओळख मराठी विभाग प्रमुख प्रा. राजरत्न दवणे यांनी करून दिली. आभार व सूत्रसंचलन प्रा. गौतम ब्रह्मे यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:40 AM 29/Jan/2025