पाचल : नवीन तालुका निर्मितीची पाचल व रायपाटण या दोन्ही गावांची मागणी आहे. मात्र, नवीन तालुका निर्माण करताना भावनिक दृष्टीकोन न ठेवता व्यावहारिकता, उपयुक्तता व नागरिकांची सोय कुठे होईल, या साऱ्या बाबींचा विचार करूनच तालुका निर्मितीचा निर्णय घेतला जाईल. पाचल स्वतंत्र तालुका निर्माण व्हावा, ही आपली मागणी शासन दरबारी पोहोचविली जाईल, असे प्रतिपादन राजापूरच्या प्रांताधिकारी डॉ. जॅसमिन यांनी केले. पाचल स्वतंत्र अपर तहसील कार्यालय निर्मिती बैठक पाचल ग्रामपंचायत येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर तहसीलदार विकास गमरे, सरपंच बावालाल फरास, उपसरपंच आत्माराम सुतार, पाचल तालुका निर्मिती कृती समितीचे सचिव किशोर नारकर, प्रमुख कार्यवाह अशोक सक्रे, अनाजी मासये आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक करताना अनाजी मासये म्हणाले, आज पाचलमध्ये सुमारे १५ विविध शासकीय कार्यालये सुरू आहेत. भविष्यात तालुक्यासाठी लागणारी ७० एकर शासकीय जमीन उपलब्ध आहे. त्यामुळे पाचल तालुक्यासाठी जागेची आता कोणतीही अडचण नसल्याचे मासये यांनी सांगितले. किशोर नारकर म्हणाले, गेले ४५ वर्षापासून आम्ही तालुक्याची मागणी करीत आहोत. पाचल हे सुमारे ४० ते ५० गावांचे मध्यवर्ती केंद्र आहे. तालुक्याच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी येथे उपलब्ध आहेत. त्यामुळे शासनाने आता पाचल स्वतंत्र तालुका निर्मितीसाठी विलंब न लावता लवकरच पाचल तालुक्याची घोषणा करावी, अशी आग्रही मागणी किशोर नारकर यांनी केली. पाचल तालुका व्हावा, या मागणीसाठी परिसरातील जनतेचा अभूतपूर्व असा उत्साह आहे. उपस्थित हजारो महिला ग्रामस्थांच्या डोळ्यात तालुक्याचे स्वप्न आहे.
आजची ही प्रचंड उपस्थिती पाहता पाचल तालुका व्हायला आता जास्त वेळ लागणार नाही, असा ठाम विश्वास अशोक सक्रे यांनी बोलताना व्यक्त केला. यावेळी परुळचे माजी सरपंच विजय सावंत, करक गावचे माजी सरपंच विलास नारकर, पांगरीचे सरपंच अमर जाधव व महिला बालकल्याण विभागाच्या माजी सभापती दुर्वा तावडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी तळवडेच्या सरपंच गायत्री साळवी, माजी जि. प. सदस्या धनश्री मोरे, महिला सामाजिक कार्यकर्त्यां पूजा शिगम, पाचल व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अण्णा पाथरे, माजी पंचायत समिती सदस्य शिवाजी रवसे, युवा कार्यकर्ते सुनील गुरव, सेवानिवृत्त पोलिस पाटील रवींद्र खानविलकर, दाजी चव्हाण, आजिवली गावचे सरपंच संजय राणे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:48 AM 29/Jan/2025














