राजापुरात विद्यार्थ्यांनी रेखाटल्या रांगोळ्या

राजापूर : राजापूर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित, राजापूर हायस्कूल, गोडे-दाते कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय यांच्या पुढाकाराने प्रथमच या शाळेच्या कलामंदिरात रांगोळी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये विद्यार्थ्यांनी रांगोळी काढण्याचे प्रशिक्षण घेत सुंदर कलाकृती साकारल्या.

कार्यकारिणी सदस्य कार्यवाह जगदीश पवार, खजिनदार अनंत रानडे आणि कार्यकारिणी सदस्य शैलेश आंबेकर यांच्या विशेष प्रयत्नाने राजापूरमध्ये रांगोळी कार्यशाळेचा उपक्रम प्रथमच घेण्यात आला. यासाठी मुंबई येथील सुप्रसिद्ध रांगोळीकार, नेपथ्यकार, चित्रकार चारूदत्त वैद्य, घाटकोपर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी रांगोळी काढण्याआधी चित्र कसे आणि कशावर काढावे, त्यासाठी कोणते रंग वापरावे, ते कसे तयार करावे, नंतर प्रत्यक्ष रांगोळी कशी काढावी याचे प्रात्यक्षिक दाखविले. मुलांनी स्वतः रांगोळी काढण्याचा यशस्वी प्रयत्न केला.

या दोन दिवसांच्या कार्यक्रमात दर्शना मांडवकर, कला शिक्षक रवींद्र घोसाळे, कला शिक्षक सचिन रावण, सुजित पारकर, सिद्धेश पारकर, दीपिका पवार यांनी हे शिविर यशस्वी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:55 AM 29/Jan/2025