लांजा : नव युवा कवी अभिव्यक्त होत आहेत, पण त्याला वाचनाची जोड आवश्यक आहे. नव्या कवींनी अनेक नामवंत कवींच्या कविता ऐकल्या पाहिजेत, वेगवेगळ्या सादरीकरण, पद्धती बघायला हव्या. त्यानंतर तुमची काव्य रचना दर्जेदार होईल. कविता कोणत्याही वृत्तात लिहा; मात्र कवितेमधील प्रत्येक शब्द, समोरच्या ऐकणाऱ्यापर्यंत पोहोचायला हवी. ऐकणाऱ्यांच्या मनात कविता पोहोचली की कविता आपसूक माणसाला जगायला शिकविते. त्यामुळे जास्तीत जास्त चांगले साहित्य वाचलात तर चांगली कविता लिहायला शिकाल, असे प्रतिपादन कोकण मराठी साहित्य परिषदेच्या युवाशक्ती जिल्हाध्यक्ष अरूण मोर्ये यांनी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लांजा येथे केले.
मराठी भाषा पंधरवडानिमित्त कोकण मराठी साहित्य परिषद लांजा शाखा व कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने काव्यमाला अंतर्गत युवावर्गासाठी लांजा तालुकास्तरीय स्वरचित काव्यवाचन स्पर्धा सोमवारी लांजा महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आली होती.
याप्रसंगी कोमसाप युवाशक्ती जिल्हाध्यक्ष अरूण मोर्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी काव्यवाचन स्पर्धेच्या मंचावर कोमसाप लांजा शाखेचे अध्यक्ष रामचंद्र जाधव, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील चव्हाण, उपप्राचार्य डॉ. के. आर. चव्हाण, मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. महेश बावधनकर, कोमसाप लांजा शाखेच्या उपाध्यक्षा डॉ. माया तिरमारे, व्ही एम कॉलेजचे प्राचार्य अनुराग पाणीग्रही उपस्थित होते.
स्पर्धेच्या प्रसंगी लांजा महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. महेश बावधनकर म्हणाले, काव्य असा प्रकार आहे की कविता सापडावी लागते. मग ती मनामध्ये किंवा मोबाईलमध्ये असेल, मोबाईलमध्ये आहे पण ती मनामध्ये साठवून ठेवण खूप अवघड आहे. जेव्हा अप्रतिम काव्य वर्णन आपण ऐकतो तेव्हा कविता नेमकी काय आहे, याची समज येते.
स्पर्धेत प्रथम क्रमांक तन्वी सरफरे कला, वाणिज्य, लांजा महाविद्यालय, द्वितीय श्रुती कालकर ज्युनिअर कॉलेज लांजा, तृतीय प्रणाली पाष्टे कला, वाणिज्य महाविद्यालय लांजा, उत्तेजनार्थ मयुरी देवस्थळी वगंधाली कोलसुकर लांजा महाविद्यालय यांनी यश प्राप्त केले. विजेत्यांना सन्मानचिन्ह, रोख रक्कम, सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. महाविद्यालयाचे प्रा. राजेश माळी, कोमसापचे प्रकाश हर्चेकर, कोमसाप लांजा तालुका युवाशक्ती विभाग प्रमुख प्रवीण कांबळे, भीमराव खोत, काशीराम जाधव, रिया लिंगायत, मनीषा पाटील यांसह विद्यार्थी उपस्थित होते.
काव्यवाचन स्पर्धेचे परीक्षण प्रा. प्रदीप कदम, प्रा. अनुप सरदेसाई यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कदम, प्रकाश हर्चेकर, प्रवीण कांबळे यांनी केले. तर आभार रिया लिंगायत यांनी मानले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:02 PM 29/Jan/2025














