लांजा : गावचे महसुली दस्ताऐवज सांभाळण्यासाठी व देखभाल करण्यासाठी तालुक्यात नवनियुक्त करण्यात आलेल्या कोतवाल, तलाठी यांना प्रशिक्षण देण्यात यावे, अशी मागणी साटवली येथील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र चव्हाण यांनी केली असून याबाबतचे निवेदन लांजा तहसीलदार यांना सादर करण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील महसुली अभिलेख, महत्त्वाचे दस्तऐवज सांभाळण्यासाठी किंवा देखभाल करण्याची जबाबदारी ही कोतवाल, तलाठी यांची आहे. परंतु सदरचे महत्त्वाचे दस्तऐवज खाजगी व्यक्ती हाताळत असल्याचे निदर्शनास येते. संबंधित तलाठी किंवा कोतवाल यांना विचारले असता तसेच संबंधित दस्ताऐवज / अभिलेख किंवा कागदपत्र यांची मागणी केली असता संबंधित तलाठी किंवा कोतवाल हे कार्यालयीन संबंधित नसलेल्या व्यक्तीची नावे सांगतात. व ते आल्यावर मिळतील असे सांगतात. या कार्यालयीन बाह्य व्यक्ती असून त्यांचा अभिलेखाशी काही संबंध नसतो. संबंधित कार्यालयीनबाह्य व्यक्ती या वर्षानुवर्षी या कार्यालयाचे अभिलेख हाताळत असतात. तसेच तलाठी कार्यालयाची चावी येथील त्यांच्याकडे असते. त्यामुळे या कार्यालयीनबाह्य व्यक्तींवर तलाठी व कोतवाल यांना अवलंबून राहावे लागते.
ही गंभीर बाब असून तलाठी दस्तऐवज हाताळण्यासाठी, त्याची जपणूक करण्यासाठी, अभिलेखाची देखभाल करण्यासाठी तलाठी किंवा नवनियुक्त कोतवाल यांना प्रशिक्षण देण्यात यावे अशी मागणी जितेंद्र चव्हाण यांनी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:16 PM 29/Jan/2025












