राजापूर : अनधिकृत मदरसा विरोधात सलग चौथ्या दिवशीही उपोषण सुरूच

राजापूर : शहरालगतच्या धोपेश्वर पन्हळे येथील अनधिकृत मदरसा विरोधात स्थानिक ग्रामस्थांनी रविवारी २६ जानेवारी पासून सुरू केलेले आमरण साखळी उपोषण बुधवारी सलग चौथ्या दिवशीही सुरूच आहे. मात्र गेली चार दिवस सुरू असलेल्या या उपोषणावर गांभीर्याने तोडगा काढण्यात प्रशासनाला पुर्णपणे अपयश आले आहे. प्रशासनाच्या या बोटचेप्या धोरणा विरोधात उपोषणकर्त्यांतुन तीव्र संताप व्यक्त होत असून जोपर्यंत हा अनधिकृत मदरसा बंद करत नाहीत तोपर्यंत माघार नाही असा आक्रमक पवित्रा उपोषणकर्त्या स्थानिक ग्रामस्थांनी घेतला आहे. या उपोषणाला आता संपुर्ण तालुक्यातुन पाठींबा मिळत असून या अनधिकृत मदरसा विरोधात प्रशासनाने कारवाई न केल्यास यापुढे आक्रमक पवित्रा घेण्याचा इशारा सकल हिंदू समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.

दरम्यान समिती अहवालावर चर्चा सुरू असून प्रशासन कारवाई करेल तोपर्यंत आपण उपोषण मागे घ्यावे असे पत्र घेऊन मंगळवारी रात्री उपोषणस्थळी गेलेल्या राजापूर तहसीलदारांना उपोषणकर्त्यांनी परत माघारी पाठविले आहे. जोपर्यंत हा अनधिकृत मदरसा बंद केल्याचे लेखी पत्र देत नाहीत तोपर्यंत माघार नाही असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे. उपोषण कर्त्यांच्या या आक्रमक पावित्र्यामुळे आता प्रशासनाकडून बुधवारी बैठकांचा सपाटा सुरू झाला आहे.

पन्हळेतर्फे राजापूर या महसुली गावातील अनधिकृत मदरसा हा अत्यंत ज्वलंत, तसेच धार्मिक तेढ वाढविणारा विषय असून सदरहू मदरसा कायमस्वरूपी बंद करावा, अशी मागणी ग्रामस्थानी यापुर्वीच केलेली आहे. प्रशासनाने याची दखल न घेतल्याने व अनधिकृत मदरशावर कारवाई न केल्याने रविवार दि. २६ जानेवारी २०२५ पासून अमोल सोगम यांसह स्थानिक ग्रामस्थांनी राजापूर तहसीलदार कार्यालयासमोर साखळी पद्धतीने आमरण उपोषण सुरु करण्यात केले आहे. रविवारपासून सुरू झालेल्या या आमरण साखळी उपोषणात स्थानिक ग्रामस्थांसह अमोल सोगम, पुरषोत्तम खांबल, धोपेश्वरचे माजी सरपंच दादा सोगम, संदिप सोगम, अरु मांजरेकर आदीसंसह स्थानिक ग्रामस्थ व महिलावर्गही मोठया संख्येने सहभागी झाला आहेत. भाजपासह शिवसेना, उ. बा. ठा या पक्षांनीही या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी उपोषणस्थळी हजेरी लावत उपोषणात सहभाग घेतला. मंगळवारी तिसऱ्या दिवशी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी उपोषणस्थळी भेट देत उपोषणकर्त्यांशी संवाद साधला. भाजपा पुर्णपणे उपोषणकर्त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. मंगळवारी उपोषणावर कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे बुधवारी सलग चौथ्या दिवशी हे उपोषण सुरू आहे. बुधवारी सकाळ पासूनच धोपेश्वर गावातील स्थानिक ग्रामस्थांसह महिलांनी या उपोषणाला हजेरी लावली. राजापूर शहरातील अनेक महिलांनीही बुधवारी या उपोषणात सहभाग घेतला. तर राजापूर शहरासह ग्रामीण भागातील अनेकांनी या उपोषणस्थळी हजेरी लावली व उपोषणात सहभाग घेत हा अनधिकृत मदरसा बंद करण्याची मागणी केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:39 PM 29/Jan/2025