रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील टेरव येथील एकनाथ माळी यांनी ग्रामपंचायतीने राबविलेल्या जलजीवन मिशन योजनेंतर्गत पाणी योजनेबाबत २६ जानेवारीपासून जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरु केले आहे. समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे बुधवारी सुद्धा हे उपोषण सुरु होते.
जलजीवन मिशन पाणी योजनेचे एमबीनुसार काम न करता चुकीची एमबी रेकॉर्ड करुन या एमबीवर सही असणाऱ्या शाखा अभियंता, उपअभियंता व कार्यकारी अभियंता यांच्यावर चौकशी करुन त्यांच्या कारवाईचे लेखी पत्र देण्यात यावे. त्याचबरोबर दापोली व खेड तालुक्यातील अधिकारी यांनी केलेल्या चौकशी बाबत चौकशी अहवाल त्वरित द्यावा. या मागणीसाठी एकनाथ माळी हे जिल्हा परिषदेसमोर उपोषणाला बसले आहेत.
जिल्हा परिषद प्रशासनाने याबाबत योग्य तो तोडगा न काढल्याने तसेच समर्पक उत्तर न दिल्याने माळी यांचे सलग तिसऱ्या दिवशीसुद्धा उपोषण सुरु आहे. जोपर्यंत प्रशासन ठोस, कारवाई करत नाही तोपर्यंत आपण उपोषण सुरुच ठेवणार, असे एकनाथ माळी यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:16 AM 30/Jan/2025














