दापोली : पत्तन विभागात बदलीचे लेखी आदेश दिल्यावर मयूर मोहितेंचे उपोषण स्थगित

दापोली : तालुक्यातील पत्तन विभाग कार्यालयातील भ्रष्टाचार करणाऱ्याविरोधात वरिष्ठ अधिकारी कोणतीही कारवाई करत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते मयूर मोहिते यांनी २६ जानेवारीला तहसीलसमोर उपोषण केले होते. विकासकामाची चौकशी होईपर्यंत व एका कर्मचाऱ्याची तात्पुरती बदली करण्याचे लेखी आदेश दिल्यावर मोहिते यांनी त्यांचे उपोषण २७ जानेवारीला स्थगित केले.

राज्यशासनाच्या पत्तन विभागामार्फत दापोली तालुक्यातील बुरोंडी येथे मच्छीमारांसाठी जेट्टी व मच्छी सुकवण्यासाठी ओटा बांधणे व हर्णे येथे मच्छी सुकवण्यासाठी ओटा बांधणे या दोन कामांसाठी निविदा प्रसिद्ध केली होती. या कामाचे कायदिशही ठेकेदाराला दिले होते; मात्र त्यातील काही कामे नियमास अनुसरून करण्यात न आल्याची तक्रार मयूर मोहिते यांनी पत्तन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली होती. त्यासाठी मोहिते १ मे २०२२ रोजी उपोषणालाही बसले होते; मात्र तेव्हा त्यांना आश्वासन देण्यात आल्याने त्यांनी उपोषण मागे घेतले होते; मात्र दिलेले आश्वासन न पाळल्याने तसेच या कार्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी साहाय्यक राकेश जाधव हे दापोली कार्यालयात १० वर्षे कार्यरत असून, त्यांची बदली करावी, अशी मागणी मोहिते यांनी या कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केल्याने काहीजणांनी मोहिते यांना शिवीगाळ करून धमकीही दिली होती.

पत्तन विभागाची विविध विकासकामे निकृष्ट दर्जाची होत असतानाही ठेकेदारांना पाठीशी घालणारे दापोली कार्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी साहाय्यक राकेश जाधव यांची बदली करावी तसेच या सर्व कामाची चौकशी करावी, अशी मागणी करत मोहिते उपोषणाला बसले होते. शासकीय अधिकाऱ्यांनी विनंती करूनही त्यांनी उपोषण मागे घेतले नव्हते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:04 AM 30/Jan/2025