संजय शिरसाट ‘सिडको’चे नवे अध्यक्ष

मुंबई : मंत्रिमंडळात स्थानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाटांची महामंडळावर वर्णी लावण्यात आली आहे. संजय शिरसाट यांची सिडकोच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

तशा प्रकारचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

शिंदे गटाचे संजय शिरसाट, भरत गोगावले आणि इतर काही नेते मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत होते. दरम्यानच्या काळात अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडली आणि भाजपसोबत सत्तेत सामील झाले. त्यामुळे शिंदे गटाच्या वाट्याला जाणाऱ्या मंत्रिपदांच्या संख्येत आणखी एक वाटेकरी वाढला. अजित पवारांच्या नऊ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याने नंतरच्या काळात शिंदे गटातील इच्छुक आमदारांची संधी हुकल्याची चर्चा आहे.

मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शक्यता कमी

गेल्या काही काळापासून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार होणार अशी सातत्याने चर्चा आहे. त्यामध्ये शिंदे गटाच्या आमदारांना संधी मिळेल अशी अपेक्षा होती. पण आता विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर आल्यामुळे किमान महामंडळावर तरी वर्णी लागावी यासाठी काहीजणांनी प्रयत्न सुरू केल्याची माहिती आहे. त्यातच आता हिंगोलीचे माजी खासदार हेमंत पाटील यांची हळद संशोधन केंद्राच्या अध्यक्षपदावर वर्णी लागली. तर संजय शिरसाटांची सिडकोच्या अध्यक्षपदी वर्णी लागली. त्यामुळे आगामी काळात मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता अगदी कमी असल्याचं बोललं जातंय.

काय आहे शासन निर्णय?

शहर व औद्योगिक विकास महामंडळ मर्यादित (सिडको) महामंडळाच्या रिक्त असलेल्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे.

शासन निर्णय

०१. शहर व औद्योगिक विकास महामंडळ (महाराष्ट्र) मर्यादित (सिडको) च्या आर्टिकल ऑफ असोशिएशन मधील आर्टिकल २०२ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारास अनुसरुन श्री. संजय शिरसाट, वि.स.स. यांची शहर व औद्योगिक विकास महामंडळ (महाराष्ट्र) मर्यादित (सिडको) च्या अध्यक्ष पदावर (मंत्री दर्जा) नियुक्ती करण्यात येत आहे.

०२. श्री. संजय शिरसाट, अध्यक्ष, शहर व औद्योगिक विकास महामंडळ (महाराष्ट्र) मर्यादित (सिडको) यांना वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक शासाऊ-१०.०२/प्र.क्र.०६/०३/सा.उ., दि.२२ ऑगस्ट, २००३ आणि शासन निर्णय क्रमांक शासाऊ १०.१०/प्र.क्र.९६/१०/सा.उ., दि.१३ मार्च, २०१२ मधील तरतुदींनुसार सेवा सुविधा उपलब्ध असतील.

०३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४०९१६१६२४३०६५२५ असा आहे. सदरहू शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:39 17-09-2024