चिपळूण : करंबवणे वाशिष्ठी-दाभोळ खाडीत माशांचा बंपर लॉट येथील स्थानिक मच्छीमारांना लागला आहे. गेल्या 25 वर्षांत प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात मासे सापडल्याने खाडीपट्ट्यातील मच्छीमार आनंद व्यक्त करीत आहेत. बंद ठेवण्यात आलेले सक्शन पंप, कमी झालेले लोटेतील प्रदूषण आणि नव्या़ सरकारच्या काळात ठप्प झालेली एलईडी मासेमारी याचा परिणाम म्हणून दाभोळ, वाशिष्ठी खाडीपट्ट्यात मच्छीमारांना बंपर मासळी सापडली आहे.
खाडीतील दिवा बेट परिसरात मंगळवारी कोतवली येथील मासेमारांना तब्बल हजार किलो तर आयनीमधील मासेमारांना 1 हजार 700 किलो मासे मिळाले. यामुळे स्थानिक भोई मासेमार व्यावसायिकांची चंगळ झाली आहे. या बद्दल या मासेमारांकडून आनंद व्यक्त होत आहे.
या खाडीत दिवा बेट परिसरात मोठ्या प्रमाणात मासे मिळतात. याच ठिकाणी लोटे सीईटीपीतून रासायनिक सांडपाणी सोडले जाते. या शिवाय गेल्या दोन वर्षांपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सक्शन पंप लावून वाळू उत्खनन सुरू होते. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून खनिकर्म विभागाने कारवाई करून हे सक्शन पंप बंद केले आहेत. या शिवाय लोटेतील कंपन्यांचे रासायनिक सांडपाण्याचे प्रदूषण देखील कमी झाले आहे आणि समुद्रातील एलईडी मासेमारी बंद केल्याने मोठ्या प्रमाणात मासे खाडीत आले आहेत आणि स्थानिक मासेमारांना त्याचा फायदा होत आहे. स्थानिक मच्छीमार दिवा बेट परिसरात जाळे लावून हे मासे पकडत आहेत आणि होड्या भरून मासे किनारी आणले जात आहेत.
लोटे एमआयडीसीतील सीईटीपीचे विस्तारीकरण झाल्यानंतर प्रदूषीत सांडपाण्याचा प्रश्न बर्याचअंशी मार्गी लागला आहे. 1997 मध्ये रासायनिक प्रदूषणामुळे वाशिष्ठी खाडी प्रदूषीत झाली होती. त्यामुळे गेली अनेक वर्षे दाभोळ खाडी संघर्ष समिती लढा देत होती. त्याचा परिणाम हळूहळू दिसू लागला आहे. या खाडीमध्ये दोन ते तीन किलो वजनाचे मासे मिळत असून घाऊक बाजारात त्याची विक्री होत आहे तर स्थानिक बाजारपेठेत 300 रूपये किलो दराने मासे विकले जात आहेत. एका व्यापार्याने घाऊक खरेदी करून हे मासे मुंबईमध्ये पाठविले आहेत.
दुर्मीळ मासे जाळ्यात…
वाशिष्ठी खाडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मासे मिळत आहेत. यामध्ये मांगण, बांण, शिंगटी, अणू, मुशी, खरबा, काही प्रमाणात कोळंबी अशाप्रकारची मासळी खाडीत सापडत आहे. त्यामुळे स्थानिक मासेमार आनंद व्यक्त करीत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:17 30-01-2025












