ग्रामीण रुग्णालयांच्या जागेप्रश्नी आ. भास्कर जाधव आक्रमक..

चिपळूण : चिपळूण तालुक्यातील रामपूर व खेड तालुक्यातील वावे येथील प्राथमिक केंद्र ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी निधीही आला आहे. मात्र, जमिनीचा प्रश्न निर्माण झाल्यासंदर्भात आ. भास्कर जाधव यांनी चिपळूणमधील रामपूर आणि गुहागरमधील आबलोली या ग्रामीण रुग्णालयांसाठी जागा उपलब्धी संदर्भात प्रांताधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन केले. यावेळी रामपूर ग्रामीण रुग्णालयासाठी आवश्यक 61 गुंठे जागा तत्काळ देण्याच्या दृष्टीने कार्यवाही होईल, अशी प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी संबंधित यंत्रणेला सूचना दिली. बुधवारी सकाळी प्रांताधिकारी कार्यालयात ही बैठक झाली.

यावेळी प्रांताधिकारी आकाश लिगाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप तहसीलदार प्रवीण लोकरे, गुहागरचे तहसीलदार परीक्षित पाटील, चिपळूणच्या तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती यादव, गुहागरचे तालुका आरोग्य अधिकारी घनश्याम जांगीड, मंडल अधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी रामपूर येथे जिल्हा परिषदेच्या नावावर सुमारे 97 गुंठे जागा आहे. या जागेमध्ये ग्रामीण रुग्णालय उभारले जाऊ शकते असे आ. भास्कर जाधव यांनी सांगितले. त्यामुळे संबंधित मंडल अधिकार्‍यांनी या ठिकाणी उपलब्ध असलेल्या जागेपैकी एकत्रित 61 गुंठ्याचा प्लॉट तयार करावा आणि त्या बाबत प्रांताधिकारी यांना तो नकाशा सादर करावा, अशा सूचना केल्या. ग्रामस्थांनी ही जागा रुग्णालयासाठी उपलब्ध करून द्यावी. त्यासाठी तत्काळ संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ यांची बैठक घ्यावी. तालुका वैद्यकीय अधिकारी, तलाठी यांनी समन्वय साधून तत्काळ या बाबत निर्णय घ्यावा, म्हणजे उपलब्ध निधीतून हे काम होईल, असे सांगितले.

गुहागर तालुक्यातील आबलोली येथेही ग्रामीण रुग्णालय उभारण्याबाबत निर्णय झाला आहे. मात्र, येथेही जागेची अडचण होती. या बाबतही चर्चा झाली. या आरोग्य केंद्रासाठी 54 गुंठे जागा उपलब्ध आहे, अशी माहिती डॉ. जगताप व डॉ. आठल्ये यांनी दिली. यावेळी गुहागर तहसीलदार परीक्षित पाटील यांनी एकूण 70 गुंठे जागा आहे. या शिवाय लगतच 30 गुंठे जागा उपलब्ध होईल, असे आ. जाधव यांना सांगितले. या बाबत तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना आ. जाधव यांनी दिल्या.

वावे केंद्राबाबत आवाज उठविणार

खेड तालुक्यातील वावे ग्रामीण रुग्णालयाच्या जागेच्या प्रश्नाबाबत यावेळी चर्चा झाली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये यांच्यावर आ. भास्कर जाधव संतप्त झाले. 1963 पासून ज्या जागेवर प्राथमिक केंद्र आहे ती जागा शासनाच्या मालकीची नसली तरी वर्षानुवर्षे तेथे शासकीय खर्च होत आहे. अशा जागा संपादीत करण्याचा शासनाचा निर्णय आहे. असे असताना त्या जागेचे बक्षीसपत्र हवे म्हणून अट्टाहास कशाला, असा सवाल आ. जाधव यांनी यावेळी केला. आपण सातत्याने वावे येथे ग्रामीण रुग्णालय होण्यासाठी पाठपुरावा करीत आहोत. मात्र, डॉ. आठल्ये नकारात्मक भूमिका घेत आहेत अशा शब्दांत नाराजी व्यक्त करून येत्या जिल्हा नियोजनच्या बैठकीत त्यावर आवाज उठविण्याचे स्पष्ट केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:20 30-01-2025