GBS Outbreak : पुणे, कोल्हापूरनंतर आता सांगली जिल्ह्यातही जीबीएसचा शिरकाव; सहा रुग्णांना लागण

GBS Outbreak : पुण्यात उद्रेक झाला असतानाच तसेच कोल्हापूरमध्येही दोन रुग्ण आढळल्यानंतर आता सांगलीमध्येही जीबीएसचा शिरकाव झाला आहे. सांगली शहरात एक तर ग्रामीण भागात पाच असे सहा गुइलेन बॅरी सिंड्रोमचे (GBS) रूग्ण आढळून आले आहेत.

या सर्व रुग्णावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. सांगली शहरात रूग्ण आढळलेल्या चिंतामणीनगरामध्ये बुधवार अखेर 600 घरांचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने सर्व्हेक्षण करत जलतपासणीही करण्यात आली आहे.

जिल्ह्यात बुधवार अखेर जीबीएसचे सहा संशयित रूग्ण आढळले

सांगली शहरातील चिंतामणीनगरमध्ये एका रूग्णाला जीबीएस आजाराची लक्षणे आढळून आली असून त्याच्यावर एका खासगी रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. जिल्ह्यात बुधवार अखेर जीबीएसचे सहा संशयित रूग्ण आढळले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी दिली. सांगलीत आढळलेला रूग्ण अजमेर, आग्रा आदी ठिकाणी जाउन आला असल्याने त्या ठिकाणी या आजाराची लागण झाली असल्याची शक्यता आरोग्य विभागाने म्हटलं आहे.

आजार संसर्ग जन्य नसल्याने घाबरण्याचे काही कारण नाही

संशयित रूग्णावर योग्य उपचार सुरू असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन करण्यात आलं आहे. नागरिकांनी पाणी उकळून पिण्याचे आणि स्वच्छतेबाबत दक्षता बाळगण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. हातापायामध्ये गोळे, मुंग्या येणे, अशक्तपणा, बोलताना, अन्न गिळताना अडचण आली, तर तत्काळ वैद्यकीय उपचार करावेत. आजार संसर्ग जन्य नसल्याने घाबरण्याचे काही कारण नाही, असेही आवाहन करण्यात आलं आहे.

पुण्यात जीबीएसमुळे पहिला बळी गेला

दरम्यान, पुण्यात जीबीएसमुळे पहिला बळी गेला आहे. सिंहगड परिसरात राहणाऱ्या नांदोशी येथील 56 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. जीबीएसमुळे झालेला हा दुसरा मृत्यू आहे. यापूर्वी सोलापुरात एका तरुणाचा मृत्यू झाला होता. मृत महिला ही कॅन्सरग्रस्त होती.15 जानेवारी रोजी ससून रुग्णालयात त्या महिलेला दाखल करण्यात आले होते. महिलेची श्वसनसंस्था निकामी झाल्याने तसेच फुफ्फुस, श्वासनलिकेला तीव्र संसर्ग झाल्याने मृत्यू झाला. पुण्यात बुधवारी नवीन 16 रुग्णांची वाढ झाली आहे. एकूण रुग्णांचा आकडा 127 वर पोचला आहे. सोमवारी रुग्णसंख्या 111 होती. मंगळवारी ही संख्या स्थिर होती. मात्र, त्यामध्ये बुधवारी नवीन 16 रुग्णांची भर पडली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:44 30-01-2025