रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात कमाल तापमान ऑक्टोबर महिन्यातच मे महिन्यासारखे भासू लागले आहे. सुरुवातीपासूनच ३० ते ३३ अंश सेल्सिअसवर तर किमान तापमान २२ ते २८ अंश सेल्सिअसवर वर-खाली होत आहे. तापमानात अचानक झालेला हा चढउतार आरोग्याच्या तक्रारी वाढविणारे ठरत आहेत.
वातावरणात असा बदल झाल्याने आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे. तापमानात अचानक झालेला बदल हा हृदयक्रियेवरील ताण वाढविण्यासोबत फुफ्फुस, प्रतिकारशक्ती यावरही परिणाम करतो. यामुळे अस्थमा, श्वसनविकार, संधिवात अशा तक्रारी वाढतात.
सध्याच्या बदललेल्या हवामानामुळे श्वसनविकाराचे रुग्ण बाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अस्थमा आणि अॅलर्जीचा त्रास असलेल्या नागरिकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. हवेतील आर्द्रतेत झालेला बदल आणि धूलिकण यामुळे अस्थमाचा त्रास वाढू शकतो. त्यामुळे अशा नागरिकांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन वेळीच उपचार करावेत. वातावरणात बदल झाल्याने प्रतिकारशक्ती कमी होत आहे. त्यामुळे सर्दी, तापाचे रुग्ण वाढू लागले आहेत, असे आरोग्यतज्ज्ञांनी सांगितले. शहरात तसेच ग्रामीण भागात सध्या ताप, सर्दी, अशक्तपणा, वात यांसारख्या आजारांचे रूग्ण खासगी डॉक्टरांकडे गर्दी करताना दिसून येत आहेत. सर्वसाधारणपणे उन्हाळ्यात रक्तदाब कमी असतो. उष्णतेमुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते आणि त्वचेतील रक्तवाहिन्यांचा विस्तार होऊन रक्तदाब कमी होतो. मात्र, तापमानातील बदलामुळे रक्तदाबात वाढ होण्याची शक्यता असते. यामुळे उच्च रक्तदाबासाठी औषधे घेणाऱ्या रुग्णांनी अधिक काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत डॉ. देवदत्त भोळे यांनी व्यक्त केले. अशा वातावरणात उष्माघाताचाही धोका असून नागरिकांनी वाढत्या तापमानात आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाने केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:07 02-10-2024
