महाराष्ट्रात निकालानंतर सन्नाटा, हे कसलं द्योतक? : राज ठाकरे

मुंबई : निवडणुकीचा निकाल लागल्यावरती, ज्यादिवशी निकाल लागला महाराष्ट्रात सन्नाटा पसरला हे पहिल्यांदा पाहिलं.लोकांमध्येच संभ्रम होता हे काय आहे कसं झाले, असा कसा निर्णय झाला. माझ्याकडे आरएसएसशी संबंधित व्यक्ती आली होती.

त्यांनी फार छान वाक्य बोलले, इतका सन्नाटा क्यू है भाई, कुणीतरी जिंकलं असेल, जल्लोष होईल. काही काही गोष्टींवर विश्वासच बसू शकत नाही. आमचे राजू पाटील, त्यांचे गाव आहे तिथे १४०० मतदार आहेत, दरवेळी त्यांना तिथे मतदान होते. त्या गावातून राजू पाटलांना एकही मत पडले नाही. अख्ख्या गावातून एक मत पडत नाही. निकालानंतर सन्नाटा हे कसलं द्योतक असा घणाघात करत मनसे प्रमुख राज ठाकरेंनी विधानसभा निवडणूक निकालांवर भाष्य केले आहे.

वरळी येथे मनसेचा राज्यस्तरीय मेळावा पार पडला. त्यावेळी राज ठाकरे बोलले की, मराठवाड्यातील आपला पदाधिकारी, तो तिथे नगरसेवक आहे. नगरसेवक झाला तेव्हा त्याला त्याच्या भागातून ५५०० मते आहेत. आता तो विधानसभेला उभा होता, त्याला विधानसभेला अडीच हजार मतदान झाले. निवडून आलेल्यांना विश्वास बसत नाही. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात सात वेळा आमदार झाले. दरवेळी ७०-८० हजार मतांनी निवडून यायचे ते या निवडणुकीत १० हजार मतांनी पराभूत होतात? राज ठाकरेंचा पराभव झाला म्हणून ते बोलतात असं काही बोलतील पण अख्खा महाराष्ट्र बोलतोय. भाजपाला १३२ जागा मिळाल्या, मागील वेळी १०५ मिळाल्या होत्या. २०१४ साली १२२ जागा होत्या. भाजपाचं समजू शकतो, पण अजित पवारांना ४२ जागा कुणाचा तरी विश्वास बसेल का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

त्याशिवाय जे इतके वर्ष राजकारण करत आले, त्या शरद पवारांना १० जागा मिळतात, हे सर्व न समजण्यासारख्या गोष्टी आहेत. ४ महिन्यापूर्वी लोकसभा निवडणूक झाली त्यात सर्वाधिक काँग्रेसचे १३ खासदार निवडून आले. एका खासदाराच्या मतदारसंघात ६ आमदार असतात. त्यांचे फक्त १५ आमदार येतात. शरद पवारांचे ८ खासदार निवडून आले, त्यांचे १० आमदार येतात. लोकसभेला ज्या अजित पवारांचा १ खासदार निवडून आला त्यांचे ४२ आमदार येतात. काय झाले, कसं झालं हा संशोधनाचा विषय आहे. लोकांनी आपल्याला मतदान केले आहे फक्त ते आपल्यापर्यंत आले नाही असा आरोप राज ठाकरेंनी केला.

दरम्यान, लोकांनी आपल्याला मतदान केले पण केलेले मतदान कुठेतरी गायब झाले, अशाप्रकारे निवडणूक लढवायची असेल तर निवडणूक न लढवलेल्या बऱ्या. कुणीही कुठल्या गोष्टीचा अमरपट्टा घेऊन आलेला नसतो. ज्या आजपर्यंत पक्षाच्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या, तुम्ही ज्या गोष्टी केल्या, कुठली आंदोलने केली, कुठले निर्णय लागले हे लोकांपर्यंत पोहचले पाहिजे. हा जाणीवपूर्वक केलेला प्रचार आणि प्रसार असतो, अनेक पत्रकार पक्षाच्या दावणीला बांधलेले असतात. ते चॅनेलमधून, वर्तमानपत्रातून काही गोष्टी पसरवत असतात. त्यात राज ठाकरे भूमिका बदलतात हे सातत्याने बिंबवले जाते असं सांगत राज यांनी आतापर्यंतचा अनेक राजकीय पक्षांचा इतिहास सांगितला.

छावा सिनेमा पाहायला हवा

बऱ्याच दिवशांनी मी तुम्हाला आणि तुम्ही मला भेटतायेत. निकाल लागल्यानंतर त्यावर मी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर काही बोललो नाही. शांत आहे म्हणजे मी विचार करत नाही असं नाही. २ महिन्यात बरेच लोक मला भेटले. परवा माझ्याकडे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर आले होते. महाराष्ट्रातील प्रत्येकाने छावा सिनेमा पाहिलाच पाहिजे. आमचे शिवछत्रपती ही प्रेरणा आहे. संभाजीराजे हे बलिदान आहे. मी ट्रेलर पाहिला नव्हता. लेझीम हा आपला पारंपारिक खेळ आहे. कदाचित संभाजी महाराजांनी लेझीम हाती घेतलीही असेल परंतु इतिहासात नाही. आपल्याकडे सगळ्यांनाच इतिहास समजायला लागला आहे. सगळ्यांच्या भावना उफाळून येतात. औरंगजेबाने केलेले अत्याचार आहेत ते डोक्यात ठेवून लोक जातील. त्यामुळे लेझीम वैगेरे काढून टाका असं सांगितले असं राज ठाकरे म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:12 30-01-2025