दादर-रत्नागिरी आणि सावंतवाडी ट्रेन पूर्वीच्या वेळेनुसार सुरू करा, अन्यथा शिवसेनेच्या वतीने रेल रोको करणार 

मुंबई : कोकणवासीयांना सोयीच्या असणाऱ्या व दादर टर्मिनस येथून सुटणाऱ्या दादर-रत्नागिरी आणि दादर- सावंतवाडी या पॅसेंजर ट्रेन पूर्वीच्या वेळेनुसार सुरू करण्यासंदर्भात शिवसेना शिष्टमंडळाने यापूर्वी ९ जानेवारी रोजी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक धरमवीर मीना यांची भेट घेऊन पत्राद्वारे विनंती केली होती. यावेळी या दोन्ही ट्रेन लवकरात लवकर सुरू करण्याबाबत रेल्वे प्रशासनाने आश्वासन दिले होते; पण त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे ठाकरे सेनेने आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

कोकणवासीयांना न्याय मागण्यासाठी २९ जानेवारी रोजी पुन्हा शिवसेना नेते माजी खासदार विनायक राऊत व आमदार सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिष्टमंडळाने मध्य रेल्वे मुख्यालयातील अपर प्रबंधक जगमोहन गर्ग यांची भेट घेतली व मागणीचे स्मरणपत्र देत दादर-रत्नागिरी आणि दादर- सावंतवाडी या पॅसेंजर ट्रेन पूर्वीच्या वेळेनुसार तातडीने सुरू करण्याबाबत आक्रमकपणे मागणी केली.

सुमारे १९ दिवस होऊनही याबाबत अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याचे दिसून येते. याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ही पॅसेंजर ट्रेन पूर्वीच्या वेळेनुसार सुरू न झाल्यास दादर येथून सुटणाऱ्या दादर-गोरखपूर व दादर-बालिया या ट्रेन समोर शिवसेना पक्ष रेल रोको आंदोलन करेल व या ट्रेनचा मार्ग रोखला जाईल, असा जाहीर इशारा रेल्वे प्रशासनाला दिला आहे. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते अरुण दुधवडकर, विभागप्रमुख संतोष शिंदे व शिवसेना प्रणित रेल कामगार सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:41 30-01-2025