‘एचपीव्ही’मुळे होणाऱ्या संभाव्य रोगांना लसीने प्रतिबंध : डॉ. अमोल पवार

चिपळूण : सर्व्हाकल कॅन्सर म्हणजेच गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग. हा महिलांमध्ये आढळणारा दुसरा सर्वात गंभीर कर्करोग असून, या कर्करोगामुळे दरवर्षी तीन लाखांहून अधिक मृत्यू होतात. गर्भशयाच्या मुखाच्या कॅन्सरची बहुतांश प्रकरणं ही एचपीव्ही विषाणूमुळे होत असतात. त्या संबंधित वॅक्सिनमुळे गर्भाशय मुखाच्या कॅन्सरला प्रतिबंध करता येत असल्याची माहिती चिपळूणचे ऑन्को-लाइफकेअर कॅन्सर सेंटरचे रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट डॉ. अमोल पवार यांनी दिली.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, २०३० पर्यंत एचपीव्हीचे ९० टक्के लसीकरण पूर्ण करून येत्या शतकात हा आजार हद्दपार करण्याचे उद्दिष्ट आहे. या पार्श्वभूमीवर येथील ऑन्को लाइफकेअर कॅन्सर सेंटरचे रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट डॉ. अमोल पवार म्हणाले, भारतात ही लस उपलब्ध असून काही सरकारी रुग्णालयांमध्ये देखील लसीकरणाची सुविधा पुरवली जाणार आहे. लैंगिकदृष्ट्या सक्रिय होण्याआधी पौगंडावस्थेतल्या मुला-मुलींना ही लस दिली तर प्रभावी ठरते. कारण, एचपीव्ही संक्रमण हे लैंगिक संबंधांदरम्यान होते आणि ही लस संसर्ग टाळू शकते. संसर्ग झाल्यानंतर ती काम करत नाही.

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, या लसीचे एक किंवा दोन डोस दिले जाऊ शकतात. रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या लोकांना दोन किंवा तीन डोस देण्याची सूचनाही जागतिक आरोग्य संघटनेने दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:53 PM 30/Jan/2025