कणकवली : एसटीच्या तिकीट दरवाढी विरोधात उद्धवसेनेच्यावतीने आज कणकवली बस स्थानकात जोरदार घोषणाबाजी करत चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाकडे प्रवाशांच्या व जनतेच्या भावना कळवा अन्यथा मोठे आंदोलन करू असा इशारा जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्यासह उपस्थित नेत्यांनी दिला.
यावेळी एसटीचे वाहतूक अधिकारी निलेश लाड यांच्याशी चर्चा करण्यात आली. एसटी प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. कणकवली बसस्थानकातील स्वच्छतागृह अस्वच्छ झाले असून त्याची तातडीने स्वच्छता करावी. यासह अन्य प्रमुख मागण्या देखील करण्यात आल्या. यावेळी या आंदोलनातील मागण्या वरिष्ठ कार्यालयाला पाठवण्याची ग्वाही लाड यांनी दिली.
बसस्थानकामधून बाहेर जाणाऱ्या एसटी रोखून धरत काहीवेळ चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी एसटीमध्ये बसलेल्या प्रवाशांना त्याचा त्रास होऊ नये याकरता प्रवाशांना पाण्याच्या बॉटल देखील वाटण्यात आल्या. जर प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळत नसतील व बसस्थानकामध्ये सोयी सुविधा नसतील तर तिकीट दरवाढीचे कारण काय? भाडेवाढीच्या नावाखाली महायुती सरकार जनतेला व प्रवाशांना वेठीस धरत असून या सरकारचा निषेध करत असल्याचेही यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
या आंदोलनात विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर आदी पदाधिकाऱ्यासह शिवसैनिक उपस्थित होते. एसटीचे वाहतूक निरीक्षक प्रदीप परब, आगार व्यवस्थापक अजय गायकवाड आदी अधिकारीही यावेळी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:40 30-01-2025
