रत्नागिरी : २०२४ या वर्षात एसटी अपघातात घट

रत्नागिरी : सर्वसामान्यांची जीवनवाहिनी बनलेली लालपरी (एसटी) वेगवेगळ्या सुरक्षामोहिमा आणि जनजागृतीमुळे सुरक्षित झाली आहे. एसटी अपघातात रत्नागिरी जिल्ह्यात वर्षभरात घट झालेली आहे. २०२३ या वर्षात एसटीचे १७९ अपघात झाले. तर, २०२४ वर्षात १७३ अपघात घडले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत अवघे सहा अपघात कमी झाले असले तरीही त्यात थोडी घट झालेली आहे. अपघात टाळण्यासाठी एसटी सेवेमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. तसेच अपघातातील मृतांचीही संख्या कमी झालेली आहे.

सुरक्षित प्रवास म्हणून लालपरीला सर्वसामान्य प्रवाशांची अधिक पसंती मिळत आहे. शासनाच्या विविध योजनांमुळे एसटीचे महत्त्व अधिक वाढले आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सुरक्षिततेवर अधिक भर देण्याची गरज आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत अपघातांची संख्या थोडीफार कमी झालेली आहे. त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन अपघात टाळण्यासाठी ठोस निर्णयाची गरज आहे. कधी चालकाच्या चुकीमुळे तर कधी अन्य वाहनांच्या चुकांमुळे किंवा नैसर्गिक कारणांमुळे एसटी अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत. किरकोळ, गंभीर व मरणांती असे अपघाताचे प्रकार आहेत. अपघातात मृत्त झालेल्या प्रवाशांच्या नातेवाइकांना तातडीची मदत दिली जाते. शिवाय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे विमा योजनेंतर्गत तिकिटामागे एक रुपया घेतला जात असल्याने एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा अपघाती मृत्यू झाल्यास विम्याची रक्कमही दिली जाते.

परिवहन महामंडळातर्फे प्रवाशांना अद्ययावत सुविधा दिल्या जातात. अपघात कमी होण्यासाठी सुरक्षा अभियान राबवण्यात येते. २०२२ मध्ये एकूण २१३ अपघात झाले होते. २०२३ ला १७९ अपघात झाले होते. तर गतवर्षी २०२४ मध्ये १७३ अपघात झाले आहेत. मागील दोन वर्षांत अपघाताची संख्या कमी झाली असून, मृतांची संख्याही घटली आहे. २०२३ मध्ये एसटी अपघातात १४ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. २०२४ मध्ये ही संख्या ११ वर आली आहे.

अपघात कमी करण्यासाठी सुरक्षामोहिमेंतर्गत चालक, वाहकांसाठी प्रबोधनात्मक कार्यक्रमांसह मार्गदर्शनपर शिबिरांचे आयोजन करण्यात येते. त्याचा चांगला फायदा होत असून, अपघातात घट झाली आहे. – प्रज्ञेश बोरसे, विभाग नियंत्रक

सुरक्षित प्रवासाबाबत मार्गदर्शन
राज्य परिवहन महामंडळातर्फे दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात रस्ता सुरक्षामोहीम राबवली जाते. या वेळी चालकांना सुरक्षित प्रवासाबाबत मार्गदर्शन केले जाते तसेच ५, १०,१५, २५ वर्षे विनाअपघात सेवा केलेल्या चालकांचा सपत्नीक सत्कारही केला जातो. सुरक्षित प्रवासासाठी प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:57 PM 30/Jan/2025