रत्नागिरी : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील प्रवेशासाठी राबवण्यात येणार्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला रविवार, दि. 2 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 947 पालकांनी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज केले आहेत. मात्र यापैकी 204 अर्ज अपात्र करण्यात आले आहेत. यामुळे 743 अर्जच वैध ठरले आहेत. दरम्यान, मुदत वाढल्याने यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
राज्य शासनाने आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी शाळांमध्ये 25 टक्के राखीव जागा ठेवल्या आहेत. या जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. या प्रवेश प्रक्रियेमधून पहिली ते आठवीपर्यंतचे शिक्षण मोफत दिले जाते. त्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क राज्य सरकारमार्फत शाळांना प्रतिपूर्तीच्या माध्यमातून देण्यात येते.
जिल्ह्यात यंदा आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी 91 शाळा पात्र ठरल्या आहेत. या शाळांमध्ये पाल्यांना प्रवेशासाठी अर्ज करण्यास 27 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. ती वाढवून 2 फेब्रुवारीअखेर करण्यात आली आहे. 91 शाळांमध्ये वंचित दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी 982 जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी 27 जानेवारीपर्यंत 947 पालकांनी प्रवेशासाठी अर्ज केले होते. त्यापैकी 204 अर्ज अपात्र ठरवण्यात आले. यामुळे सध्यातरी 743 अर्ज पात्र ठरले आहेत.
आता मुदत वाढल्याने ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:03 31-01-2025












