रत्नागिरी : काळबादेवी गावाची पर्यटकांना भुरळ

रत्नागिरी : रत्नागिरीतील काळबादेवीतील स्वयंभू कालिकामंदिर आणि समुद्रकिनारा हे १० वर्षापूर्वी पर्यटन स्थळ म्हणून घोषित झाले. येथील रहिवासी पर्यटकांसाठी घरगुती निवारा केंद्र उभारून आपली आर्थिक स्थिती बळकट करत आहेत. पूर्वी हे गाव ‘गलबताचे गाव’ म्हणून ओळखले जात होते. आता या गावाची आकर्षक पर्यटन स्थळ म्हणून ओळख होऊ लागली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ६ व वर्गातील आणि ८१ क वर्गातील पर्यटन स्थळे आहेत. यातील काळबादेवीचे कालिका मंदिर परिसर व समुद्र किनारा हे १० वर्षापूर्वी पर्यटन स्थळ जाहीर झाले. येथील निसर्गाच्या विपुल सृष्टीसौंदर्यामध्ये पुरातन आणि स्वयंभू कालिका मंदिर, या मंदिरातील पांडव कालीन घंटा, पाषाण मंदिर, समुद्र किनाऱ्याचा समावेश आहे. हे काळबादेवी गाव समुद्रकिनारी असल्याने गावातील सर्व विहिरींचे पाणी मचुळ आहे. पंरतु याच गावातील मंदिराच्या विहिरीतील पाणी गोड आहे.

त्यामुळे या गावाची पर्यटकांना भुरळ पडू लागली आहे. हे गाव गणपतीपुळे मार्गावर असल्याने येथून येणारे-जाणारे पर्यटक आवर्जून भेट देऊ लागले आहेत. पर्यटकांचे प्रमाण वाढू लागल्याने सर्वच पर्यटकांची राहण्याची सोय होऊ शकत नाही. अशा पर्यटकांना रस्त्यावर किंवा त्यांच्या वाहनांतच थांबावे लागत होते. त्यामुळे येथील कृषी पर्यटन रिसॉर्टच्या संचालक पूजा प्रभु यांनी गावातीलच रहिवाशांना घरगुती निवारा करण्याबाबतचे मार्गदर्शन केले. त्यानुसार अनेक घरांमध्ये सुधारणा करुन घरगुती निवारा उपलब्ध करुन देण्यात आला आहे, त्यातूनच आता पर्यटकांना आवश्यक असणाऱ्या पुरक उद्योगांनाही चालना मिळू लागली आहे.

काळबादेवीत पूर्वी शेट्ये आणि मयेकरांची गलबते होती. अवजड सामान वाहतुकीसाठी शिडाचे मोठे जहाज म्हणजेच गलबतांचे मालक या गावातील होते. हळूहळू या गलबत उद्योगाचा अस्त होत गेला. आता गावाला पर्यटनांची जोड मिळाल्याने पुन्हा गावाची आर्थिक स्थिती रुळावर येऊ लागली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:30 AM 31/Jan/2025