रत्नागिरी : जिल्हा परिषद इच्छुकांचा जीव पुन्हा टांगणीला

रत्नागिरी : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व ओबीसी आरक्षणावर मंगळवारी सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी होण्याची शक्यता होती. मात्र, सुप्रीम कोर्टाने पुन्हा तारीख पे तारीख देत २५ फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी घेतली आहे. त्यामुळे निकाल लांबल्याने निवडणुकाही पुढे जाणार आहेत. परिणामी जिल्ह्यातील इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. केलेली तयारी पाण्यात जाणार की काय? याची धास्ती त्यांना लागली आहे.

लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीनंतर जिल्ह्यातील राजकीय पदाधिकाऱ्यांचे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे लक्ष लागले होते. गेल्या ३ वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्यामुळे निवडणुका लांबणीवर पडल्याचे चित्र आहे. यातच मंगळवारी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात निवडणुका आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात सुनावणी झाली. परंतु, पुन्हा न्यायालयात पुढील तारीख देण्यात आली आहे.

सर्वोच्य न्यायालयाने याप्रकरणी पुढील सुनावणीसाठी दि. २५ फेब्रुवारी ही तारीख दिली आहे.

एक महिन्यानंतर ही सुनावणी होणार असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आणखी लांबणीवर पडल्या आहेत. सर्वच पक्षांच्या इच्छुकांनी जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण तर नगरपालिका क्षेत्रातील वॉर्डामध्ये गुडघ्याला बाशिंग बांधले आहे.

तसेच जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली होती. मात्र, पुन्हा निवडणुका लांबणीवर पडल्या असल्याने इच्छूक उमेदवारांचा हिरमोड झाला आहे. दि. २५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सुनावणीनंतरच या निवडणुकांचे काय होणार हे समजणार आहे.

जिल्हा परिषदेवर २५ वर्षे सेनेचा भगवाच…
जिल्हा परिषदेचा इतिहास बघितला तर पूर्वी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांची एक जिल्हा परिषद होती. १९९२ ला पुनर्रचना झाली. यामध्ये रत्नागिरी जिल्हा व सिंधुदुर्ग जिल्हा स्वतंत्र जि.प. झाली. १९९२ ला झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली. यानंतर १९९७ ला निवडणूक झाली. यामध्ये मात्र शिवसेनेने एकतर्फी विजय मिळवत काँग्रेसचा धुव्वा उडवला. तेव्हापासून सेनेने जि.प. वरील आपले वर्चस्व कधी सोडलेच नाही. आता मात्र राजकीय स्थिती बदलली आहे. यामुळे येणारी निवडणूक ही रंगतदार य चुरशीची होणार हे निश्चित आहे.

निवडणूक नव्या रचनेनुसार होणार का?
नव्या रचनेनुसार रत्नागिरी जिल्हा परिषदेचे ६२ गट व १२४ पंचायत समिती गण तयार झाले आहेत. पूर्वी ५५ गट होते तर ११० मण होते. आता गट व गण वाढल्यामुळे इच्छुकांचा उत्साह वाढला आहे. असे असले तरी यावेळच्या निवडणुका नवौन रचनेनुसार होणार की पूर्वीच्याच रखनेनुसार जुन्या पद्धतीने होणार, याबाबतची संदिग्धता कायम आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:52 AM 31/Jan/2025