रत्नागिरी : ‘माझी पीएच.डी : एक ध्यासपर्व’ पुस्तकाचे उद्या प्रकाशन

रत्नागिरी : डॉ. विजयालक्ष्मी विजय देवगोजी यांनी लिहिलेल्या ‘माझी पीएच.डी : एक ध्यासपर्व’ या पुस्तकाचे प्रकाशन वाटूळ (ता. राजापूर) येथे शनिवारी (दि.१ फेब्रुवारी) दहाव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात होणार आहे.

‘कष्टप्रद संशोधनाची रोचक, वेधक अन् प्रेरक कथा’ अशा शब्दांत प्रसिद्ध साहित्यिक डॉ. विनोद गायकवाड यांनी गौरविलेले, डॉ. मनीषा नेसरकर यांच्या लेखणीतून ‘संघर्ष, सत्त्वपरीक्षा, सहनशीलता आणि सातत्याचा प्रवास’ अशा मौलिक शब्दांचे लेणे चढलेले, ‘निष्क्रियतेत आयुष्य व्यतीत करणाऱ्या ध्येयहीन, मूल्यहीन व क्रियाहीन झालेल्या युवा पिढीला दीपस्तंभासारखे मार्गदर्शन करणार लेखन’ अशा शब्दांत ‘माझी पीएच.डी : एक ध्यासपर्व’ या पुस्तकाचे कौतुक ज्येष्ठ साहित्यिक व विधिज्ञ विलास कुवळेकर यांनी केले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन राजापूर लांजा नागरिक संघाच्या वाटूळ येथे भरणाऱ्या दहाव्या साहित्य संमेलनामध्ये ग्रंथालीचे प्रमुख आणि ज्येष्ठ संपादक दिनकर गांगल, तसेच ख्यातनाम कीर्तनकार, प्रवचनकार भारताचार्य सु. ग. शेवडे यांच्या हस्ते होत आहे. या कार्यक्रमास सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:14 31-01-2025