रत्नागिरी : शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते, शिवसेनेचे पहिले रत्नागिरी जिल्हाप्रमुख, राजापूर मतदारसंघाचे माजी आमदार विजयराव तथा आप्पा साळवी (वय ९५ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने सोमवारी रात्री निधन झाले.
मंगळवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेच्या बांधणीत आप्पा साळवी यांचे महत्त्वाचे योगदान होते.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे खंदे, निष्ठावान कार्यकर्ते आणि कडवट शिवसैनिक म्हणून आप्पा साळवी ओळखले जात. सेना- भाजप सरकारच्या काळात त्यांनी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख म्हणून काम केले होते. त्यांच्या कार्यप्रणालीमुळे १९९० च्या सुमारास शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी रत्नागिरीचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपवली. १९९५ मध्ये आमदार म्हणून पहिल्यांदा ते विधानसभेवर निवडून गेले होते.
सोमवारी रात्री त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, तीन मुली व जावई, असा परिवार आहे.