आता माझ्या मंत्रिपदाची वेळ निघून गेली, पुढील सरकारमध्ये हा भरतशेठ मंत्री असणार : भरत गोगावले

रायगड : आपल्या मंत्रिपदाची वेळ आता निघून गेली आहे, राहिलेल्या काही दिवसांसाठी आपल्याला कुणीही मंत्रिपद देऊ शकत नाही आणि कुणीही ते घेणार नाही. पण पुढच्या महायुती सरकारमध्ये मी मंत्री असणार हे निश्चित असं शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी म्हटलं.

आपल्याला आता एसटी महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आलं आहे, पण मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून मी पुढचा निर्णय घेणार असंही ते म्हणाले.

शिंदे गटातील तिघांची महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली. त्यामध्ये आनंदराव अडसूळ, हेमंत पाटील आणि संजय शिरसाटांच्या नावाचा समावेश आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना भरत गोगावले यांनी हे वक्तव्य केलं. पहिल्या वेळी मंत्रिपदासाठी माझं नाव होतं, पण मी त्याला नकार दिला असं भरत गोगावले म्हणाले.

नशिबात असणाऱ्या गोष्टी घडतात

भरत गोगावले म्हणाले की, शिवसेनेतील तिघांना महामंडळ मिळाले ही चांगली बाब आहे. त्या तिघांचेही मी अभिनंदन करतो. नशिबात असणाऱ्या गोष्टी घडत असतात. त्यामुळे नाराज होण्याचं काहीच कारण नाही. मंत्रिमंडळातील मंत्री किती आणि त्यांमधील लोक किती हे समजून आतापर्यंत आम्ही चालत आलो आहोत. निवडणुकीसाठी आता खूप कमी दिवस उरलेत. येणाऱ्या 5 ऑगस्टला आचारसहिंता लागण्याची शक्यता आहे. 20 दिवसांसाठी मंत्रिपद कोणी घेऊ शकत नाही, कुणीच देऊ शकत नाही.

मंत्रिपदाची वेळ टळून गेली

भरत गोगावले म्हणाले की, माझ्या मंत्रिपदाची वेळ आता टळून गेली आहे. माझ्या मंत्रिपदाचा विचार आता तरी होणार नाही. माझ्या मंत्रिपदाबाबत कोणतंच राजकरण नाही. पुढील 20 दिवसांत मला कोणीच मंत्रिपद देऊ शकत नाही. पुढच्या महायुतीच्या सरकारमध्ये भरतशेठ मंत्री असणार हे निश्चित.

एसटी महामंडळ घ्यायचं की नाही ते ठरवू

शिंदे गटातील काही नेत्यांची महामंडळावर वर्णी लागल्यानंतर भरत गोगावले म्हणाले की, आपलीही एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लागल्याची माहिती आहे. पण ते स्वीकारायचं की नाही त्यावर शिंदे साहेबांशी चर्चा करणार आणि मग निर्णय घेणार.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:39 17-09-2024