Team India into Finals, U19 Women T20 World Cup 2025 : १९ वर्षाखालील महिला टी२० विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताच्या पोरींनी दमदार विजय मिळवत फायनलमध्ये धडक मारली. भारतीय महिलांनी सेमीफायनलच्या सामन्यात इंग्लंडचा ९ गडी राखून पराभव केला.
यासह टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. त्याआधी पहिल्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. त्यामुळे आता गेल्या वर्षीप्रमाणे पुन्हा एकदा टी२० वर्ल्डकप फायनलमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका आमने सामने असणार आहेत. रविवारी, २ फेब्रुवारीला हा सामना रंगणार आहेत. भारतीय संघ या स्पर्धेचा गतविजेता आहे.
भारतीय गोलंदाजांची धमाकेदार कामगिरी
संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाचे वर्चस्व होते. ग्रुप स्टेजनंतर भारताने सुपर सिक्समधील सर्व सामने जिंकले. उपांत्य फेरीतही हे वर्चस्व कायम राहिले. स्पर्धेत भारताला अजून कुणीही पराभूत करू शकलेला नाही. त्यात दुसऱ्या उपांत्य सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. त्यांनी चांगली सुरुवातही केली होती. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी दणके दिले. ४ षटकांत बिनबाद ३७ धावा झाल्यानंतर पारुनिका सिसोदियाने ५व्या षटकात २ बळी घेतले. त्यानंतर पुन्हा ४४ धावांची भागीदारी झाली. मात्र संघाची धावसंख्या ८१ असताना आयुषी शुक्लाने जोडी फोडली. येथून इंग्लंड संघाच्या पडझडीला सुरुवात झाली. पुढील १२ धावांत त्यांनी ५ बळी गमावले. त्यामुळे इंग्लंडला केवळ ११३ धावांपर्यंतच मजल मारता आली. वैष्णवी शर्माने २३ धावांत ३ बळी, पारुनिकाने २१ धावांत ३ बळी तर आयुषीने २१ धावांत २ बळी टिपले. पारुनिकाला तिच्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी सामनावीर म्हणूनही निवडण्यात आले.
जी कमलिनीची अप्रतिम फलंदाजी
११४ धावांचा पाठलाग करताना भारताच्या दोन्ही सलामीवीरांनी शानदार फलंदाजी केली. जी कमलिनी आणि जी त्रिशा यांनी ९ षटकात ६० धावा केल्या. नवव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्रिशा २९ चेंडूत ३५ धावा करून बाद झाली. याचा भारतीय संघावर परिणाम झाला नाही. सानिका चाळकेसह कमलिनीने उर्वरित धावा सहज पूर्ण केल्या. या महत्त्वाच्या सामन्यात त्याने ५० चेंडूत ५६ धावांची खेळी करत संघाला विजयापर्यंत नेले. भारताने इंग्लंडचा ५ षटके आणि ९ गडी राखून पराभव केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:01 31-01-2025
