रत्नागिरी : जलजीवन मिशन योजनेंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या १ हजार ४३२ पाणी योजनांपैकी सप्टेंबर २०२४ ला मुदत संपलेल्या ४०० योजनांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव शासनाला पाठवला आहे. ५०० योजना पूर्ण झाल्या असून, ५०० योजनांचे काम प्रगतिपथावर आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकरण पुजार यांनी दिली.
गावांमध्ये पावसाचे पाणी साठवणूक करण्याच्या व स्रोत बळकटीकरणाच्या योजना हाती घेतल्या होत्या, या योजनेंतर्गत हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांद्वारे अनेक गावांच्या उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याच्या समस्या यशस्वीपणे सोडवण्यात आल्या आहेत. याच घतींवर केंद्र शासनाद्वारे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत स्त्रोत बळकटीकरण उपाययोजना हाती घेतली; परंतु २०१८ पासून राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत या योजनांची अंमलबजावणी केंद्र शासनाद्वारे थांबवली आहे. सध्याच्या परिस्थितीत केंद्र व राज्य शासनाच्यावतीने जलजीवन मिशन कार्यक्रम (२०२०-२४) राबवण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत हर घर नलसे जल या उद्देशाने ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना वैयक्तिक नळजोडणीद्वारे ५५ लिटर प्रतिदिन प्रतिव्यक्ती पाणीपुरवठा करण्याचे प्रस्तावित आहे.
सुमारे १ हजार १०० कोटींचा आराखडा
जिल्ह्यात जलजीवन मिशनअंतर्गत १ हजार ४३२ योजना राबवण्यात येत आहेत. सुमारे १ हजार १०० कोटींचा हा आराखडा आहे; परंतु अनेक योजनांना जागेची अडचण येत असल्याने सुधारित आराखडा तयार करून पाठवावा लागणार आहे. त्यामुळे हा आराखडा १ हजार ६०० कोटीवर जाण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील या योजनांची मुदत सप्टेंबरमध्ये संपली. यापैकी ५०० योजना पूर्ण झाल्या असून, ५०० योजनांचे काम प्रगतिपथावर आहे; परंतु मदत संपलेल्या ४०० योजनांना मुदतवाढ मिळावी यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:52 AM 02/Oct/2024














