मुंबई : राज्यात पावसाने आता विश्रांती घेतली आहे. मंगळवारी (१ ऑक्टोबर) रोजी काही तुरळक ठिकाणी राज्यात पाऊस झाला. मात्र, पुढील काही दिवस राज्यात तापमान कोरडे राहणार आहे.
तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. परंतु पुढील काही दिवसांत तापमानात वाढ होणार असून ऑक्टोबर हीट नागरिकांना जाणवणार आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोकण ते ईशान्य मध्य प्रदेश महाराष्ट्रालगत एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ या चारही उपविभागांमध्ये पुढील पाच ते सात दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली व सोलापूर येथे मेघगर्जना व विजांचा कडकडाट सहित तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना आज येलो अलर्ट दिला आहे.
राज्याच्या उर्वरित भागात पुढील चार ते पाच दिवस तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
मुख्यतः मराठवाडा विदर्भामध्ये काही ठिकाणी हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात पुढील चार ते पाच दिवस आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
तापमानात होणार वाढ
सध्या ऑक्टोबर महिना सुरू झाला असून या महिन्यात नागरिकांना ऑक्टोबर हीटचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे जिवाची काहिली होणार आहे. राज्यातील काही भागात तापमान कोरडे असून तापमानात काही प्रमाणात वाढ होणार आहे. त्यामुळे घराबाहेर पडतांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मराठवाड्यात तापमान
२ ते ४ ऑक्टोबर दरम्यान आकाश स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. ५ ऑक्टोबर रोजी नांदेड, हिंगोली व धाराशिव जिल्हयात आकाश दुपारनंतर अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मराठवाडयात ५ ऑक्टोबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मराठवाडयात येत्या २४ तासात कमाल तापमानात हळूहळू १ ते २ अंश सेल्सियसने वाढ होणार आहे. पुढील तीन ते चार दिवसात किमान तापमानात हळूहळू २ ते ३ अंश सेल्सियसने घट होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
शेतकऱ्यांना काढणीस आलेल्या सोयाबीन पिकाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी, फवारणीची कामे पावसाची उघडीप बघून करावी. तापमान वाढ लक्षात घेऊन पशुंची उन्हापासून बचाव करण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी आणि सुरक्षित व बंधिस्त ठिकाणी बांधावे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:00 02-10-2024