रत्नागिरी : चिंद्रवली येथील खेडकुळी येथे श्री गणेश मंदिरात पारंपरिक पद्धतीने गेली दोन दिवस माघी गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने सुरू आहे. नवसाला पावणारा गणपती म्हणून या मंदिराचे महात्म्य आहे. नवस फेडण्यासाठी अनेकजण गुळाच्या ढेपी श्रींना अर्पण करतात. विविध कार्यक्रमाने शनिवारी (ता. १) या उत्सवाची सांगता होणार आहे. यानिमित्ताने आरत्या, भोवत्या, कीर्तन आयोजित केले आहे.
रत्नागिरापासून २५ किलोमीटरवर असलेल्या चिंद्रवली गावात हे खेडकुळी गाव आहे. येथील गणेश मंदिर तांबे घराण्याकडे आहे. जीर्णोद्धारामुळे स्वयंभू गणेश मंदिराची शोभा अधिकच वाढली आहे. या गणपती मंदिराला सुमारे ३०० वर्षांची ऐतिहासिक परंपरा आहे. यंदाच्या उत्सवाचीही भक्तांना उत्सुकता आहे. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ कै. डॉ. श्री. बालाजी तांबे हे मूळचे खेडकुळीचे. त्यांनी माता, पिता वासुदेव धुंडिराज तांबेशास्त्री आणि लक्ष्मीबाई वा. तांबे यांच्या स्मरणार्थ या मंदिराचा – जीर्णोद्धार केला.
गुरुवारी (ता. ३०) हा उत्सव सुरू झाला शनिवारी (ता. १) या उत्सवाची सांगता होणार आहे. ३० आणि ३१ ला रात्री १० वाजता आरती, साडेदहा ते दोन भोवत्या, छबिना आणि २ वाजता विश्वनाथ बुवा भाटये यांचे कीर्तन, असे कार्यक्रम झाले. शनिवारी (ता. १ फेब्रुवारी) दिवसभर धार्मिक विधी, रात्री १० वाजता आरती, रात्री ११ ते ४ भोवत्या, ४ वाजता विश्वनाथ भाटये यांचे लळित कीर्तन आणि त्यानंतर नैवद्य म्हणून दिवसभर भक्तांनी आणलेला गूळ कीर्तनात प्रसाद म्हणून वाटला जाणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:45 AM 01/Feb/2025














