दापोली : उंबरशेत येथील कंपनीच्या मायनिंगमुळे सार्वजनिक विहिरींचे पाणी दूषित होत आहे. या प्रकाराबाबत जाब विचारणाऱ्या ग्रामस्थांना ठेकेदारांकडून धमक्या दिल्या जात आहेत. याबाबत ग्रामस्थांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे.
उंबरशेत येथील ग्रामस्थ कंपनीच्या या दंडेलशाहीबाबत उपोषणाला बसले होते. २००५ पासून या भागात कंपनीकडून उत्खनन सुरू आहे. यामुळे येथील निसर्गसंपदा धुळीला मिळाली आहे, असे उपोषणकर्त्या ग्रामस्थांचे म्हणणे आहे. १९ वर्षे येथील ग्रामस्थ या कंपनीचा जुलूम सहन करत आहेत. ज्या ठिकाणी उत्खनन सुरू आहे, तिथे पाण्याचा मुबलक साठा आहे. हे पाणी आजूबाजूच्या गावांना मिळावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे. मात्र याबाबत शासन विचाराधीन दिसत नसून पाणी टंचाई काळात दापोलीतून टँकरने पाणी पुरविले जात आहेत. तसेच या उत्खननाकडे दुर्लक्ष केले जात आहे. कंपनीचे ओव्हरलोड धावणारे डंपरमुळे संपूर्ण गाव धुळीने माखले आहे. शाळकरी मुलांना, ग्रामस्थांना दररोज धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. कंपनीचे कामकाज तत्काळ थांबवून शासनाने आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी उंबरशेत येथील ग्रामस्थांनी केली आहे.
गेली १९ वर्षे आशापुरा कंपनीकडून होणाऱ्या उत्खननाच्या त्रासाला ग्रामस्थ सामोरे जात आहेत. आता पिण्याच्या पाण्याच्या विहिरीच्या बाजूलाही जोरदार उत्खनन सुरू आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. हे उत्खनन जर थांबले नाही तर यापुढे जनआंदोलन पुकारले जाईल – जहूर झोंबडकर, सामाजिक कार्यकर्ते
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 AM 01/Feb/2025














