चिपळूण : संपूर्ण राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांच्या सेवा सोसायट्यांचे गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेले प्रश्न लवकरच मार्गी लाऊन त्याना अधिक सक्षम करून त्यांच्या माध्यमातून राज्यातील बेरोजगारीचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे प्रतिपादन चिपळूण संगमेश्वरचे आ. शेखर निकम यांनी केले आहे. राज्य बेरोजगार व स्वयंरोजगार फेडरेशन तसेच बृहन्मुंबई व मुंबई फेडरेशन यांच्यावतीने त्यांचा साखर भवन येथे मुंबई जिल्हा बँकेचे संचालक नंदकुमार काटकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आ. निकम बोलत होते.
आज सातत्याने सरकार दरबारी या बेरोजगार संस्थांचे प्रश्न ते मांडत आहेत. नुकतेच त्यांनी राज्यातील या सेवा सोसायट्याना विना निविदा १० लाख रुपयांची कामे सरकारकडून देण्याचे आदेशही मंजूर करून घेतले असून येणाऱ्या अधिवेशनात उर्वरित प्रश्नांबाबत आवाज उठविणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
सातत्याने सर्व खात्याच्या मंत्र्यांकडेही सदरच्या सेवा संस्थांना कामे उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करीत असल्याने राज्यातील सर्व फेडरेशनच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्यांच्याच विनंतीनुसार सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली साखर भवन नरिमन पॉईंट मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. राज्यातील पंजीकृत स्वयंरोजगार बेरोजगार सेवा सहकारी संस्थांच्या प्रलंबित मागण्यांबाबत या बैठकीत चर्चा होऊन सेवा संस्थांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याबाबत मंत्रिमहोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. या बैठकीला आ. प्रसाद लाड, सचिव कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, सहकार आयुक्त, उपसचिव सार्वजनिक बांधकाम विभाग, नंदकुमार काटकर, सिकंदर पटेल (लातूर), शरद देवरे (नाशिक), जनार्दन चांदणे (पालघर), सचिन कोल्हापुरे (रत्नागिरी), समीर रजपूत (औरंगाबाद), जयंत शिरीषकर, स्वप्निल फाटक, श्रीनिवास देवरूखकर, विजय केदारे तसेच राज्यातील जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष व संचालक यावेळी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:44 AM 01/Feb/2025














