रत्नागिरी : राजापूर विधानसभा मतदारसंघाच्या विकासाला चालना देण्यासाठी दळणवळण, शैक्षणिक, वैद्यकीय सुविधा, पर्यटन विकास, आपत्ती नियंत्रण, बंदर विकासासाठी आमदार किरण सामंत यांनी लक्ष वेधले आहे. मतदार संघाच्या विकासाच्या दृष्टीने पाच हजार कोटीचा निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी आ. किरण सामंत यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे.
लांजा राजापूर विधानसभा मतदार संघ हा मागील अनेक वर्षांपासून विकासापासून वंचित राहिला आहे. या मतदार संघातील बेरोजगारीच्या प्रश्नासह अनेक विकास कामे प्रलंबित आहेत. दळणवळण सुविधांमध्ये सागरी महामार्गावरील पुलांचे बांधकाम करणेसाठी रु. १००० कोटी इतका निधी आवश्यक आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत २५५.८१ किमीच्या रस्त्यांसाठी रु. २०४.६५ कोटी इतका निधी आवश्यक आहे. रेल्वेच्या लांब पल्ल्यांच्या गाडयांना आडवली, विलवडे, सौंदळ, राजापूर रोड येथे थांबे मिळणे आवश्यक आहे. राजापूर रेल्वेस्टेशन येथे सरकता जिना करणेसाठी रु. १५ कोटीसह रेल्वे आरक्षण सुविधा पूर्ववत करुन पोस्ट कार्यालयामध्ये सुरु करण्यासाठी कोकण रेल्वे कार्पोरेशन लि. आणि भारतीय डाक विभाग यांच्यामध्ये करार करणे आवश्यक आहे.
शैक्षणिक सुविधांसाठी, आयुष महाविद्यालयाची स्थापना करणे, युनानी महाविद्यालयाची स्थापना करणे, दंत चिकित्सा महाविद्यालयाची स्थापना करणे, होमिओपॅथिक महाविद्यालयाची स्थापना करणे, शैक्षणिक सुविधांचे बळकटीकरण करणेसाठी रु. १०० कोटींच्या निधीची मागणी केली आहे.
पर्यटन विकासाअंतर्गत या मतदारसंघातील कातळशिल्पांना राष्ट्रीय संरक्षित स्मारकांचा दर्जा देणे, संवर्धन करणे व जोडरस्ते तयार करणेसाठी ५० कोटी, सागरमाला अंतर्गत राजापूर तालुक्यातील समुद्र किनाऱ्यांवर मूलभूत सुविधा उपलब्ध करणेसाठी २०० कोटी, राजापूर तालुक्यातील जुवे जैतापूर येथिल सागरी बेटांचा विकास योजनेंतर्गत २५ कोटी इतक्या प्रस्तावास मान्यता देणे, पुरातन मंदिरे व स्मारके जतन व संवर्धनासाठी २०० कोटी, गड किल्ले व ऐतिहासिक ठेवा जतन व संवर्धनासाठी २०० कोटी मागणी केली आहे.
आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत भूमिगत विद्युत वाहिन्या करणेसाठी ५०० कोटी, धूपप्रतिबंधक बंधारे बांधणेसाठी ३०० कोटी, ग्रोयन्स बंधारे व खाडीमुखाजवळील गाळ काढणेसाठी ५०० कोटी, आपत्त्कालिन निवाराशेड बांधणेसाठी १०० कोटी, खारभूमी बंधारे बांधणेसाठी १५० कोटी मागणी करण्यात आली आहे.
बंदर विकासांतर्गत अणसुरे, धानीवरे, नाटे, साखरीनाटे, कातळी, डोंगर, नाणार ता. राजापूर व हर्चे ता. लांजा ही बंदरे विकसित करण्यासाठी २०० कोटी, बंदर जोडरस्ते विकसित करणेसाठी ४०० कोटी, डिजिटल इंडिया अंतर्गत ग्रामिण भागात दर्जेदार मोबाईल नेटवर्क सुविधा निर्माण करणेसाठी ४०० कोटी, स्मार्ट सिटी अंतर्गत लांजा व राजापूर शहरासाठी ५०० कोटी इतका निधी उपलब्ध करुन देणे.
वैद्यकीय सुविधांचे बळकटीकरण करणेसाठी १५० कोटी मागणी केली आहे. सर्व कामांमुळे नागरिकांचे जीवनमान सुधारण्यास हातभार लागेल. सदैव विकासाची तत्वे अग्रस्थानी ठेवत असल्याने या विकासकामांसाठी आवश्यक निधी त्वरित मंजूर करून दयावा. ज्या विकासकामांची कार्यवाही लवकरात लवकर सुरू करता येणार आहे. निधीची मागणी करतानाच आपल्या मार्गदर्शनाने आणि सहकायनि मतदारसंघातील नागरिकांचे स्वप्न साकार होईल, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्राद्वारे राजापूर-लांजा-साखरपा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:14 PM 01/Feb/2025














