Pune : मार्केटयार्डात हापूसची आवक

पुणे : गोड, रसाळ कोकणातील हापूस म्हटल्यावर कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. अशा हापूसची मार्केट यार्डातील फळ विभागात आवक सुरू झाली आहे. येथील बाजारात आंब्याची पाच डझनाच्या पेटी व अडीच डझनाच्या एक बॉक्सची शुक्रवारी आवक झाली.

रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे भागातील रीळ या गावातील शेतकरी मकरंद काणे यांच्या बागेतून येथील फळबाजारातील आडतदार अरविंद मोरे यांच्या मे. गणेश फ्रुट एजन्सी (पांगारे) या फर्मवर ही आवक झाली. बाजार समितीच्या फळे व तरकारी विभागाचे प्रमुख बाळासाहेब कोंडे व अडतदार युवराज काची यांच्या हस्ते आंब्याच्या पेटीचे पूजन झाले. पाच डझनांच्या या पेटीला लिलावात तब्बल २१ हजार रुपये भाव मिळाला. आडतदार युवराज काची यांनी या आंब्यांच्या पेटीची खरेदी केली. ही हंगामपूर्व आंब्याची आवक आहे.

रत्नागिरी हापूस आंब्याचा नियमित हंगाम हा मार्चपासून सुरू होतो. त्यावेळी आवक वाढते. तोपर्यंत तुरळक आवक सुरू असते. या प्रसंगी बाजार समिती फळविभाग गटप्रमुख दादा बांदल, आडतदार गणेश यादव, राजू भोले, परेश शहा, नाना झेंडे, सुधीर मनसुख, व्यापारी सीताराम वाडकर, माउली आंबेकर, विठ्ठल माने, फशी बागवान उपस्थित होते. यावेळी कोकणातून केशर आंब्याची आवक यापूर्वीच सुरू झाली आहे.

पुण्यातील बाजारात हंगामपूर्व हापूसची आवक सुरू झाली आहे. आता हळूहळू आवक वाढत जाणार आहे. मार्चमध्ये नियमित आवक सुरू होईल.– अरविंद मोरे, आंब्याचे व्यापारी, मार्केट यार्ड

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:58 01-02-2025