खेड : जनतेच्या सुरक्षिततेसाठी दिवसरात्र झटणाऱ्या येथील पोलिस कर्मचाऱ्यांच्या वसाहतीची दुरवस्था झाली आहे. पोलिस कर्मचारी वसाहत उभारण्यासाठी शिवसेना नेते रामदास कदम यांच्या प्रयत्नाने सुसज्ज नवीन वसाहत उभारणीसाठी ४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. पोलिस यंत्रणेकडून भूमिपूजन सोहळ्याची तशी जय्यत तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे १८ महिन्यांतच पोलिस कर्मचारी हक्काच्या घरात वास्तव्यास जाणार आहेत.
खेड येथील ब्रिटिशकालीन पोलिस वसाहत अखेरची घटकाच मोजत आहे. २० खोल्यांची वसाहत पडझडीच्या उंबरठ्यावरच असल्याने सद्यः स्थितीत एकही पोलिस कर्मचारी वास्तव्यास नाही. जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली येथौल पोलिस निरीक्षक नितीन भोयर यांनी शिवसेना नेते रामदास कदम व आमदार योगेश कदम यांचे लक्ष वेधले होते.
नवीन वसाहतीचा प्रस्तावही मंत्रालयात मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. याला अखेर यश आले. नवीन कर्मचारी वसाहत उभारण्यासाठी ४२ कोटी ५० लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून पोलिस कर्मचाऱ्यांसाठी ५२ अद्ययावत खोल्यांची उभारणी करण्यात येणार आहे. पोलिस निरीक्षकांसाठीही स्वतंत्र निवासस्थान उभारण्यात येणार आहे. पोलिस कर्मचाऱ्यांच्या मुलांना विरंगुळ्यासाठी त्याठिकाणी तीन सुसज्ज उद्यानांचाही समावेश आहे तसेच वास्तव्यास असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांसाठी सर्वसोयीसुविधांयुक्त मैदानाचाही समावेश आहे. याच ठिकाणी नवीन पोलिस ठाण्याचीही उभारणी करण्यात येणार आहे. येथे दैनंदिन कामकाजासाठी पोलिस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांसाठी पार्किंग व्यवस्थाही करण्यात येणार आहे. नवीन वसाहतीच्या कामाचे उद्घाटन येत्या काही दिवसांत करणार असून, त्या अनुषंगाने या ठिकाणी स्वच्छता करण्यात येत आहे.
सद्यःस्थितीत पोलिस वसाहतीसमोर असलेल्या मंदिराची जागाही बदलण्यात येणार असून, अद्ययावत मंदिराची उभारणी करण्यात येणार आहे. मंदिरात नागरिकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. – नितीन भोयर, पोलिस निरीक्षक
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:26 AM 02/Oct/2024














