गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गणपतीपुळे येथे शनिवार माघी यात्रोत्सव मोठ्या भक्तिभावाने उत्साहात पार पडला. रविवारी 2 फेब्रुवारी रोजी दुपारी या यात्रेची सांगता झाली. या यात्रेनिमित्ताने स्थानिक भाविकांचा जनसागर उसळल्याचे पाहायला मिळाले.
गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात दरवर्षी माघी यात्रा ही स्थानिक भाविकांची म्हणून ओळखली जाते. त्यामुळे घाटमाथ्यावरील भाविकांपेक्षा या यात्रेला स्थानिकांची मोठी उपस्थिती दिसून आली. त्यामध्ये गणपतीपुळे तीर्थक्षेत्राबरोबर नजीकच्या मालगुंड, वरची निवेंडी, भगवतीनगर, वरवडे, नेवरे, भंडारपुळे, धामणसे खंडाळा व जाकादेवी, तसेच संपूर्ण रत्नागिरी तालुक्यातील व जिल्ह्यातील स्थानिक भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी व यात्रेच्या खरेदी निमित्ताने मोठी गर्दी केली होती.
या यात्रेच्या निमित्ताने जिल्ह्यातील व परजिल्ह्यातील अनेक दुकानदार आपली विविध वस्तूंची दुकाने घेऊन दाखल झाले होते. त्यामुळे माघी यात्रेनिमित्त आलेल्या सर्व ठिकाणच्या भाविकांनी श्रींच्या दर्शनाबरोबरच विविध वस्तूंच्या खरेदीचा आनंद लुटला. या माघी यात्रोत्सवाच्या निमित्ताने संस्थान श्री देव गणपतीपुळेच्या वतीने स्वयंभू श्रींचे मंदिर पहाटे पहाटे 5 वा. दर्शनासाठी खुले करण्यात आले.
यावेळी प्रारंभी गणपती मंदिराच्या मुख्य पुजार्यांच्या हस्ते पूजाअर्चा, मंत्रपुष्प व आरती झाल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिरात सोडण्यात आले. यावेळी भाविकांना दर्शन योग्य प्रकारे मिळावे, याकरिता संस्थान श्रीदेव गणपतीपुळेच्या वतीने मंदिर परिसरात भाविकांच्या सोयीसाठी दर्शन रांगांची व्यवस्था करण्यात आली होती. या दर्शन रांगांमधून स्थानिक भाविकांनी स्वयंभू श्रींचे श्रद्धापूर्वक दर्शन अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने रांगेत उभे राहून घेतले. यावेळी संपूर्ण मंदिर परिसरात भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. या दर्शन रांगांच्या ठिकाणी संस्थान श्री देव गणपतीपुळे येथील सुरक्षारक्षक व कर्मचारी त्याचबरोबर पोलिस कर्मचारी यांनी दर्शन रांगांतील भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपली कामगिरी चोख बजावली.
या निमित्ताने घाटमाथ्यावरील काही गणेश मंडळांकडून भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी माघी यात्रेमध्ये आलेल्या अनेक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या यात्रेच्या निमित्ताने आलेल्या भाविकांच्या वाहनांची वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी रत्नागिरी येथील वाहतूक कक्षाच्या पोलिस कर्मचार्यांनी विशेष मेहनत घेतली. त्याचबरोबर संपूर्ण गणपतीपुळे मंदिर परिसर, समुद्र चौपाटी आणि सर्वच परिसरात भाविकांच्या नियंत्रण ठेवण्यासाठी आणि अनुचित प्रकार रोखण्यासाठी सर्वच पोलिस कर्मचारी यांनी मोठी मेहनत घेतली.
माघी यात्रेच्या निमित्ताने संस्थान श्री देव गणपतीपुळेच्या वतीने सायंकाळी 4 वाजता मंदिराच्या प्रदक्षिणामार्गे वाजत गाजत ढोल -ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत स्वयंभू श्रींची पालखी मिरवणूक काढण्यात आली. या पालखी मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या भाविकांनी मंगलमूर्ती मोरया’ चा जयघोष करून संपूर्ण परिसर दणाणून सोडला. या माघी यात्रा उत्सवामध्ये घाटमाथ्यावरील काही गणेश मंडळांकडून श्रींच्या पालख्या गणपतीपुळे येथे पायी दिंडीद्वारे दर्शनासाठी आणण्यात आल्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:04 03-02-2025














