रत्नागिरी : मिरकरवाडा बंदर परिसरातील अतिक्रमण हटविल्यानंतर कोट्यवधीचे व्यवहार करणाऱ्या नौका मालक, मासळी खरेदी करणाऱ्या पुरवठा दारांसह मोठी गुंतवणूक करणाऱ्यांना उन्हाचे चटके सोसावे लागत आहेत. अतिक्रमण हटविण्यापूर्वी नौका उभ्या राहतात, त्या जेटींजवळ कापडी छत उभारण्यात आले होते. अशीच तात्पुरती छताची सोय होण्यासाठी मत्स्य व्यवसाय विभागाकडे विनंती करण्यात आली आहे.
मिरकरवाडा समुद्रात अनेक जेटी आहेत. याठिकाणी मासेमारी करुन येणाऱ्या नौका उभ्या करुन नौकांमधील मासळी उतरवली जाते. तेथेच त्या मासळीची पुरवठादारांकडून खरेदी करुन वेगवेगळ्या राज्यात पाठविली जाते. यावेळी नौका मालक खरेदी विक्री व्यवहारासाठी उपस्थित असतात. बहुसंख्य नौका दुपारच्या वेळीच जेटीवर येत असल्याने उन्हापासून संरक्षण होण्यासाठी बांबू आणि कापडाचे छत होते. बंदरावरील अतिक्रमण हटविताना हे छत सुद्धा तोडण्यात आले. त्यानंतर सर्व व्यवहार उन्हातान्हातूनच करावे लागत आहेत.
पर्ससीन नेट मच्छिमार नौका बांधणीसाठी सुमारे १ कोटी रुपये खर्च होतात. त्याचबरोबर मासळी खरेदी करणारे पुरवठादार लाखो रुपयांची मासळी खरेदी करत असतात. अशी ही मोठी गुंतवणूक करणाऱ्या नौका मालक आणि पुरवठादारांना उन्हाचे चटके सोसावे लागत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:16 AM 03/Feb/2025














