राजापूर एसटी आगारातर्फे नवदुर्गा दर्शन सोहळ्याचे आयोजन

राजापूर : तालुक्यातील धार्मिक पर्यटनाला चालना मिळावी या उद्देशाने येथील हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानच्यातर्फे एसटी महामंडळाच्या राजापूर आगारातर्फे शारदीय नवरात्रोत्सव काळात नवदुर्गा दर्शन सोहळ्याचे आयोजन केले आहे. ४ ते १९ या कालावधीत सवलतीच्या प्रवासी दरात नऊ दिवस चालणाऱ्या या दर्शनमात्रेचा भाविकांना लाभ घेता येणार आहे. त्यात जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश मयेकर यांनी केले आहे.

नवरात्रोत्सवात दररोज सकाळी ७ ते सायंकाळी ७.३० वा. ही दर्शनयात्रा असणार आहे. या दर्शनयात्रेकरिता दररोज सकाळी ७ वा. राजापूर शहरातील श्री निनादेवी मंदिर येथून एसटी बस निघणार आहे. नऊ दुर्गादेवीचे दर्शन घेऊन सायंकाळी ७.३० वा. राजापूर येथे परत गाडी येणार आहे. या एका दिवसाच्या यात्रेकरिता पुरुष भाविकांना ५५५ रु., महिला व लहान मुले यांना ५ ते १२ वर्षे आणि ज्येष्ठ नागरिक यांना ४४४ आणि अमृतज्येष्ठ भक्तांना ३३३ अशा सवलतीच्या दरात ही यात्रेची संधी उपलब्ध करण्यात आली आहे. त्यातील सहभागी भाविकांना सकाळी चहा, नाश्ता, दुपारी जेवण, सायंकाळी चहाची सोय केली जाणार आहे. या यात्रेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आधारकार्डासह महेश मयेकर, मोहन घुमे, मंदार बावधनकर, विवेक गुरव, निकेश पांचाळ, प्रसन्न देवस्थळी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन राजापूर एसटी आगार आणि हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

भेटी देण्यात येणारी मंदिरे
पेंडखळे येथील श्री जाकादेवी, देवीहसोळ श्री आर्यादुर्गा, भालावली येथील नवदुर्गा, आडिवरेची श्री महाकाली, धाऊलवल्लीची श्री नवलादेवी, होळीची श्री भरतदुर्गा, मिठगवाणेची श्री मुहूतदिवी, साखरची नवलादेवी, विल्येची श्री दुर्गादेवी या मंदिरांना दर्शनयात्रेत भेटी देण्यात येणार आहेत.

भाग्यवान महिलेस मानाची साडी
नवदुर्गा दर्शन सोहळ्यात सहभागी होणाऱ्या महिलांपैकी एका महिलेला मानाची साडी भेट देण्यात येणार आहे. मानाच्या साडीच्या मानकरी महिलेची निवड लकी ड्रॉ पद्धतीने काढण्यात येणार असून, दरदिवशी ही लकी ड्रॉ सोडत होऊन दरदिवशी एका सहभागी महिलेला मानाची साडी मिळणार आहे. सोबत सहभागी प्रवाशांना विमा संरक्षणही मिळणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:37 AM 02/Oct/2024